नाशिकमध्ये राजकीय भूकंप! आमदार देवयानी फरांदेंचा सीमा हिरेंच्या मतदारसंघावर ‘सर्जिकल स्ट्राईक’

एकाच पक्षातील दोन महिला आमदारांमध्ये ‘कोल्ड वॉर’? नाशिक पश्चिममधील गुन्हेगारीवरून राजकीय वातावरण तापले!

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.४:- नाशिकच्या राजकारणात आज एका नव्या वादळाने प्रवेश केला आहे. नाशिक मध्यच्या कार्यक्षम आमदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवयानी फरांदे यांनी थेट नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या कार्यक्षेत्रातील वाढत्या गुन्हेगारीवर तोफ डागल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. स्वतःच्या मतदारसंघातील कामांचा पाढा वाचण्याऐवजी, फरांदे यांनी हिरे यांच्या मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे उडत आहेत, याचा सनसनाटी खुलासा केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे कोण कार्यक्षम आणि कोण अकार्यक्षम, याचा फैसलाच त्यांनी जनतेसमोर मांडल्याने त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

मतदारांमध्ये संतापाची लाट, “आम्ही यांना निवडून का दिले?”

देवयानी फरांदे यांनी केलेल्या या गौप्यस्फोटानंतर नाशिक पश्चिममधील मतदार चांगलेच संतापले आहेत. “ज्या लोकप्रतिनिधीला आम्ही मोठ्या विश्वासाने निवडून दिले, त्यांच्याच कार्यक्षेत्रात जर गुन्हेगारांचे साम्राज्य वाढत असेल, तर अशा प्रतिनिधित्वाचा उपयोग काय?” असा संतप्त सवाल नागरिक विचारू लागले आहेत. वाढते गुन्हे, दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्या आणि गुंडांचा वावर यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आगामी महापालिका निवडणुकीत या ‘अकार्यक्षमतेचा’ बदला घेण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे.


‘स्क्रॅप’च्या साम्राज्यावरून भविष्यात ‘गँगवॉर’ची भीती?

या निमित्ताने अनेक गंभीर प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

  •    नाशिक पश्चिममधील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आमदार सीमा हिरे आणि त्यांचे पदाधिकारी नक्की काय करत आहेत?
  •    अंबड औद्योगिक वसाहतीमधील कोट्यवधी रुपयांच्या ‘स्क्रॅप’च्या धंद्यात नेमके वाटेकरी कोण आहेत? या धंद्यातून मिळणाऱ्या पैशातूनच गुन्हेगारीला खतपाणी घातले जात आहे का?
  •    गुन्हेगारांना राजकीय आश्रय देणारे स्थानिक पदाधिकारीच तर नाहीत ना?
  •    ‘स्क्रॅप’च्या वर्चस्वावरून भविष्यात दोन गटांमध्ये भीषण ‘द्वंद्वयुद्ध’ (गँगवॉर) पेटण्याची शक्यता आहे का?

    या सर्व प्रश्नांची उत्तरे आमदार सीमा हिरे यांनी जनतेला द्यावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. देवयानी फरांदे यांनी लावलेल्या या ‘आगी’वर सीमा हिरे कशा प्रकारे ‘पाणी’ टाकतात की ही आग आणखी भडकते, याकडे संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले आहे. मात्र एक नक्की, या राजकीय कुरघोडीने नाशिक पश्चिममधील सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!