धक्कादायक : उपनगर पोलीस ठाणे आहे की ‘ओपन एअर’ देशी अड्डा?….खाकीच्या अंगणातच ‘तळीराम’ आडवा; शासकीय वाहनाच्या सावलीत मद्यपीची बिनधास्त विश्रांती!

,दिलाल 🚨 दिवा- नाशिक .दि.२५ (विशेष प्रतिनिधी):‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या खाकी वर्दीच्या अंगणातच कायद्याची आणि शिस्तीची उघड्या माथ्याने अशी काही ‘ऐसीतैसी’ झाली आहे की, पाहणाऱ्याने डोक्यावर हात मारावा! नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या थेट प्रांगणात, शासकीय वाहनाच्या अगदी जवळ एका मद्यपी महाशयाने असा काही ताणून दिला आहे की, जणू हे पोलीस ठाणे नसून मद्यपींसाठी सुरू केलेले एखादे ‘मोफत विश्रामगृह’ किंवा ‘ओपन बार’ असावे

पोलीस गाडीचा पहारा आणि महाशयांची ‘गाढ निद्रा’

 

 समोर आलेल्या या विदारक आणि तितक्याच हास्यास्पद दृश्यावरून उपनगर पोलीस ठाण्याच्या आवारात नेमके काय चालले आहे, असा खडा सवाल उपस्थित होत आहे. अधिकृत पोलीस वाहनाच्या (बोलेरो) शेजारीच हा महाशय पायात चपला नसलेल्या अवस्थेत, संपूर्ण शुद्ध हरपून जमिनीवर पालथा पडलेला दिसत आहे. सामान्य नागरिकाला पोलीस ठाण्याची पायरी चढतानाही धडकी भरते; पण या बहाद्दराने मात्र थेट ठाण्याच्या उंबरठ्यावरच ‘झिंगाट’ होऊन अंग टाकले आहे.

खाकीचा धाक संपला की मद्यपींना अभय मिळाले?

 पोलीस ठाण्याच्या दारातच दिवसाढवळ्या हा सगळा ‘तमाशा’ रंगत असताना ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि अंमलदार नेमके काय करत होते? हा तळीराम पोलिसांच्या संरक्षणात झोपला होता की पोलिसांचा धाकच इतका संपला आहे की मद्यपींना दारू पचवण्यासाठी पोलीस ठाण्यापेक्षा सुरक्षित जागा दुसरी कोणती वाटत नाही? असा मार्मिक आणि उपरोधक टोला आता नाशिककर लगावत आहेत.

गुन्हेगारांचे काय, मद्यपींचा मात्र ‘व्हीआयपी’ थाट!

 उपनगर परिसरात गुन्हेगारीला आळा घालण्याचे सोडून पोलीस ठाण्याच्या आवारातच असे ‘नशामुक्त भारता’चे धिंडवडे निघत असतील, तर दाद कोणाकडे मागायची? अवैध धंदे आणि मद्यपींवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या पोलिसांच्या नाकाखालीच जर असा देशी अड्डा भरत असेल, तर वरिष्ठ अधिकारी याची दखल घेऊन उपनगर ठाण्याला ‘जागे’ करणार की हा ‘नशेतला कारभार’ असाच घोरत पडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!