नॅशनल ज्युनिअर आर्चेरीत यजमान राजस्थानचा उडवला धुव्वा; कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदकावर कोरले नाव; नाशिकच्या अभिराज जाधवसह सुवर्ण चौकडीचा भेदक निशाणा !
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.२६:-विशेष क्रीडा प्रतिनिधी । नाशिक / जयपूरजयपूरच्या गुलाबी नगरीत धनुष्याची प्रत्यंचा अशी काही ताणली गेली की, सुसाट सुटलेल्या बाणांनी थेट सुवर्णपदकालाच वेधले! नॅशनल ज्युनिअर आर्चेरी चॅम्पियनशिपच्या महामुकाबल्यात महाराष्ट्राच्या युवा वाघांनी यजमान राजस्थानच्या बालेकिल्ल्यात घुसून त्यांचा अक्षरशः धुव्वा उडवला. श्वास रोखून धरणाऱ्या अंतिम लढतीत प्रतिस्पर्ध्यांना निष्प्रभ करत महाराष्ट्राच्या पुरुष कंपाऊंड संघाने राष्ट्रीय विजेतेपदावर आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.
अंतिम फेरीत थरार! राजस्थानचे आव्हान हवेत विरले
जयपूरच्या मैदानावर रंगलेला अंतिम सामना म्हणजे कौशल्याची आणि मानसिक संयमाची पराकाष्ठा ठरली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या राजस्थानच्या संघाचा प्रचंड दबाव असतानाही, महाराष्ट्राच्या युवा तिरंदाजांचे हात किंचितही थरथरले नाहीत. ‘करो या मरो’च्या प्रत्येक क्षणी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी १० पैकी १० गुणांचा अचूक वेध घेत प्रतिस्पर्ध्यांच्या गोटात खळबळ उडवून दिली. सुरुवातीपासूनच सामन्यावर घट्ट पकड मिळवत महाराष्ट्राने यजमानांना डोके वर काढण्याची साधी संधीही दिली नाही आणि हा ऐतिहासिक विजय खेचून आणला.
या ‘सुवर्ण चौकडी’ने रचला इतिहास!
या महाविजयाचे खरे शिल्पकार ठरले ते म्हणजे—अभिराज जाधव, मानव जाधव, हर्षवर्धन इंगळे आणि श्रेयश मुंडे! या चौघांच्या अद्भुत सांघिक ताळमेळाने आणि अचूक लक्ष्यभेदाने संपूर्ण स्टेडियम अचंबित झाले. उपांत्य फेरीपर्यंत एकतर्फी वर्चस्व गाजवणाऱ्या या चौकडीने फायनलमध्ये दाखवलेली जिद्द आणि तंत्रशुद्ध खेळ पाहून उपस्थित क्रीडा रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना मानवंदना दिली.
अभिराज जाधवचा ‘झंझावात’: अवघ्या दोन वर्षांत कॉलेज ते थेट राष्ट्रीय चॅम्पियन!

या सुवर्ण कामगिरीत नाशिकचा युवा तिरंदाज अभिराज जाधव याने केलेली कामगिरी थक्क करणारी ठरली. अभिराजचा हा क्रीडाप्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा रंजक आणि प्रेरणादायी आहे. २०२३ मध्ये महाविद्यालयीन स्पर्धेतून तिरंदाजीत पहिले पाऊल ठेवणाऱ्या अभिराजने कठोर सराव आणि अफाट आत्मविश्वासाच्या बळावर अवघ्या अल्पावधीत तब्बल ६ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये धडक मारली. नंदुरबार येथील राज्यस्तरीय स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करून त्याने महाराष्ट्र संघात आपले स्थान पक्के केले होते. आता राष्ट्रीय मंचावर सुवर्णवेध घेत अभिराजने केवळ महाराष्ट्राचाच नव्हे, तर अवघ्या नाशिकचा डंका देशभर वाजवला आहे.
‘अब सब कुछ महाराष्ट्र!’ क्रीडा जगतात जल्लोष
“आम्ही केवळ खेळायला गेलो नव्हतो, तर सुवर्णपदक जिंकण्याचा निर्धार करूनच मैदानात उतरलो होतो,” असा आत्मविश्वास दाखवणाऱ्या या युवा वीरांवर सध्या संपूर्ण राज्यातून कौतुकाचा प्रचंड वर्षाव होत आहे. या ऐतिहासिक विजयानंतर क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे सर्व स्तरातून जोरदार अभिनंदन केले जात आहे.






