‘फिटनेस की डोस, अर्धा घंटा रोज’चा नारा देत वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनीच गाजवला सायकलिंगचा आखाडा
लाल 🚨नाशिक, दि. २४ ऑगस्ट:एरवी गुन्हेगारांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या गाड्या आणि सायरनच्या आवाजाने दणाणून जाणारे नाशिकचे रस्ते आज एका अभूतपूर्व दृश्याने थक्क झाले होते. पोलीस आयुक्त कार्यालयापासून निघालेला तो पोलिसांचा ताफा नव्हता, तर तो होता फिटनेसचा नारा देत निघालेल्या सायकलस्वारांचा महासागर! निमित्त होते, ‘फिट इंडिया’ मोहिमेअंतर्गत नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने आयोजित केलेल्या विशेष सायकलिंग ड्राईव्हचे.
पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाने आज संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. ‘फिटनेस की डोस, अर्धा घंटा रोज’ हा संदेश केवळ कागदावर न ठेवता, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः सायकलवर स्वार होऊन तो कृतीत आणला. सकाळी ७ वाजता पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांनी झेंडा दाखवताच पोलीस आयुक्त कार्यालयातून निघालेल्या शेकडो सायकलस्वारांनी रस्त्यावर जणू काही आरोग्याची नवी क्रांतीच आणली.
या सायकलिंगच्या थरारात केवळ पोलीसच नव्हे, तर नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अनुभवी सायकलपटू, शाळा-कॉलेजांतील उत्साही तरुण-तरुणी आणि होमगार्ड्स यांनीही उडी घेतली होती. १०, २५ आणि ५० किलोमीटरच्या आव्हानात्मक मार्गांवर वयालाही लाजवेल असा उत्साह दिसून येत होता. केटीएचएम कॉलेज, गोल्फ क्लब, सिटी सेंटर मॉल मार्गे अंजनेरीच्या दिशेने सुसाट वेगाने धावणाऱ्या सायकली पाहून नाशिककरही अवाक झाले.
स्पर्धेची रंगत तर शिगेला पोहोचली होती. १५ वर्षांच्या तरुणांपासून ते ५० वर्षांवरील अनुभवी नागरिकांपर्यंत प्रत्येक जण जिंकण्याच्या ईर्षेने सायकल चालवत होता. या आरोग्यदायी स्पर्धेतून पोलीस आणि जनता यांच्यातील नात्याचा एक वेगळाच पैलू आज नाशिककरांनी अनुभवला.
सायकलिंगचे ‘सिंघम’: यांनी मारली बाजी !
या थरारक स्पर्धेत विविध वयोगटांतून अनेक विजेते पुढे आले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्री. किरणकुमार चव्हाण यांच्या हस्ते विजेत्यांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांनी सन्मानित करण्यात आले.
१० किलोमीटर स्पर्धा:
पुरुष (१५-२५): अमन जावेद शेख (प्रथम), यश वाबळे (द्वितीय)
महिला (१५-२५): सीमा घुगे (प्रथम), सानिया शेख (द्वितीय)
पुरुष (२५-५०): गोविंद सिंधीकर (प्रथम), भूषण संजय (द्वितीय), सपोनि. किरण कोरडे (तृतीय)
२५ किलोमीटर स्पर्धा:
पुरुष (१५-२५): सिद्धेश तुपे (प्रथम), मयंक मधुकर कड (द्वितीय)
पुरुष (२५-५०): सुरेश डोंगरे (प्रथम), योगेश पाटील (द्वितीय)
वरिष्ठ (५०+): वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड (प्रथम)
महिला (२५-५०): मपो हवा. अश्विनी देवरे (प्रथम), रंजना गायकवाड (द्वितीय)
५० किलोमीटर महास्पर्धा:
पुरुष: डॉ. गणेश लोहार (प्रथम), सतीश महाजन (द्वितीय)
महिला:सौ. नलिनी मधुकर कड (प्रथम)
या अभूतपूर्व आयोजनासाठी सहायक पोलीस आयुक्त श्री. संदीप मिटके, पोलीस निरीक्षक श्रीमती पाटील, राखीव पोलीस निरीक्षक श्री. शंकर जंगवाड आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी होती. या उपक्रमाने केवळ आरोग्याचा संदेश दिला नाही, तर पोलीस हे जनतेचे मित्र आहेत आणि त्यांच्या आरोग्यासाठीही ते तितकेच जागरूक आहेत, हा विश्वासही दृढ केला.







