कर्तव्यनिष्ठेचा राष्ट्रपतींकडून सन्मान; नाशिकचे डॉ. अचल मुदगल आणि विश्वास पाटील यांचा गौरव
लाल 🚨 दिवा-नाशिक,
दि.१४:– विशेष प्रतिनिधी:नाशिक शहर पोलीस दलातील दोन कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अचल मुदगल आणि चुंचाळे एमआयडीसी पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक श्री. विश्वास पाटील यांना त्यांच्या गुणवत्तापूर्ण आणि उल्लेखनीय सेवेबद्दल अत्यंत प्रतिष्ठेचे ‘राष्ट्रपती पोलीस पदक‘ जाहीर झाले आहे.
आपल्या कारकिर्दीत दाखवलेली अतूट निष्ठा, प्रामाणिकपणा, गुन्हेगारी रोखण्यासाठी केलेले धाडसी प्रयत्न आणि अथक परिश्रमाची दखल थेट भारत सरकारने घेतली आहे. या घोषणेमुळे संपूर्ण नाशिक शहर पोलीस दलात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण पसरले आहे.
डॉ. अचल मुदगल यांनी गुन्हे शाखेत अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल आपल्या कौशल्याने केली आहे, तर श्री. विश्वास पाटील यांनी आपल्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांचा सन्मान हा केवळ त्यांचा वैयक्तिक गौरव नसून, तो संपूर्ण नाशिक पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर उमटलेली मोहोर आहे.
या अभूतपूर्व यशाबद्दल पोलीस आयुक्त, वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी आणि नाशिकच्या नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशाने तरुण पोलीस कर्मचाऱ्यांपुढे एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.
दोन्ही सन्माननीय अधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! 💐💐







