गुन्हे शाखेच्या युनिट-१ ची धाडसी कारवाई; गुप्त बातमीदाराच्या अचूक खबरीने फरार आरोपींना ठोकल्या बेड्या! मुख्य सूत्रधार बाळा पाठक अजूनही फरार.
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. ६:-नाशिक शहरात टॅक्सी चालकाकडे ५० हजारांची खंडणी मागून दहशत पसरवणारे आणि फरार असलेले श्रमिक सेनेचे पदाधिकारी बाळा उर्फ भगवंत पाठक याचे तीन क्रूर साथीदार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने कसारा-शिरोळे परिसरातील ‘हॉटेल टर्निंग पॉईंट‘ येथे थरारक सापळा रचून या तिघांच्या मुसक्या आवळल्या. या धाडसी कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी टॅक्सी चालक संतोष भारूडकर यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात (गु.र.क्र. ३९०/२०२३) फिर्याद दिली होती. द्वारका ते कसारा टॅक्सी व्यवसाय चालवण्यासाठी बाळा पाठक आणि त्याच्या टोळक्याने ५० हजार रुपये उकळले आणि नंतर पुन्हा ७० हजार रुपये व प्रत्येक ट्रिपमागे १०० रुपयांचा हप्ता मागितला होता. पैसे न दिल्याने भारूडकर यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. गुन्हा दाखल होताच मुख्य सूत्रधार बाळा पाठकसह सर्व आरोपी फरार झाले होते.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर गुन्हे शाखा युनिट-१ या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. तपासादरम्यान, युनिटचे पोलीस हवालदार प्रदीप म्हसदे यांना त्यांच्या एका गुप्त आणि विश्वासू बातमीदाराकडून या फरार आरोपींविषयी पक्की खबर मिळाली. आरोपी कसारा-शिरोळे परिसरात लपून बसले असल्याची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांनी तात्काळ एक विशेष पथक तयार केले.
पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने कसारा-शिरोळे परिसरातील ‘हॉटेल टर्निंग पॉईंट’वर सापळा रचला. आरोपी काही कळण्याच्या आतच पोलिसांनी त्यांना चारी बाजूंनी घेरले आणि पळ काढायची संधीही न देता त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला.
जेरबंद केलेले खंडणीखोर:
1. इप्पा भाई उर्फ इरफान युसूफ पठाण (वय ४४, रा. बागवानपुरा, भद्रकाली)
2. आसिफ फायटर उर्फ आसिफ आमीन कादरी (वय ३८, रा. बागवानपुरा, भद्रकाली)
3. आबिदभाई उर्फ धोबी उर्फ आबिद इस्माईल शेख (वय ३३, रा. किस्मतबाग, शालीमार)
या तिन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी मुंबईनाका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या कारवाईनंतर आता या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार बाळा पाठक याचा शोध पोलिसांनी अधिक तीव्र केला असून, तोदेखील लवकरच गजाआड होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पोलिसांच्या धाडसी कामगिरीचे कौतुक!
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, आणि सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, पोउनि चेतन श्रीवंत, आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने ही धाडसी आणि यशस्वी कामगिरी केली आहे. या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.







