कायद्याला खिशात घालून हद्दपार गुंडाचा नाशकात उच्छाद! भर बाजारात धारदार शस्त्र नाचवून व्यापाऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या ‘भाई’चा खंडणी विरोधी पथकाने केला ‘खेळ खल्लास’!

पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर खंडणी विरोधी पथक ॲक्शन मोडमध्ये; सराईत गुन्हेगाराला धाडसी कारवाईत अटक.

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. २१:- ऑगस्ट: शहरात कायदा आणि सुव्यवस्थेला खुलेआम आव्हान देत, धारदार शस्त्र नाचवून व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका कुख्यात हद्दपार गुंडाच्या खंडणी विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. राहुल सुनील खंडारे (वय २३) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून, त्याच्या अटकेमुळे आडगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी दिलेल्या आदेशानंतर खंडणी विरोधी पथक ॲक्शन मोडमध्ये आले आहे. पथकातील खबऱ्यांचे जाळे सक्रिय असतानाच पोलीस अंमलदार भगवान जाधव व भरत राऊत यांना एक धक्कादायक माहिती मिळाली. शहरातून हद्दपार केलेला सराईत गुन्हेगार राहुल खंडारे हा आडगाव परिसरात खुलेआम फिरत असून, धारदार शस्त्र दाखवून बाजारातील दुकानदारांना धमकावून पैशांची मागणी करत असल्याची माहिती त्यांना मिळाली.

या माहितीच्या आधारे, खंडणी विरोधी पथकाने तात्काळ सापळा रचला. मंगळवारी (दि. १९) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास, धात्रक फाटा येथील महालक्ष्मीनगरमधील एका मोकळ्या जागेत पथकाने दबा धरून राहुल खंडारे याला रंगेहाथ पकडले. त्याची झडती घेतली असता, त्याच्या कंबरेला लावलेले एक धारदार शस्त्र सापडले. एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशानेच तो परिसरात दहशत माजवत असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनाच दिले होते आव्हान

राहुल खंडारे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि विनयभंगासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्याला शहरातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र, कायद्याची भीती न बाळगता तो पुन्हा शहरात शिरला आणि त्याने आपले गुन्हेगारी सत्र सुरू केले. त्याने केवळ हद्दपारीच्या आदेशाचेच उल्लंघन केले नाही, तर पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या शस्त्रबंदी आदेशालाही केराची टोपली दाखवली.

पथकाची धडाकेबाज कामगिरी

याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, उपआयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण यांच्यामार्गदर्शनाखाली वपोनि. जग्वेंद्रसिंग राजपुत यांच्या नेतृत्वात, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप सगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप भोई, पोलीस हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, पोलीस नाईक भूषण सोनवणे, मंगेश जगझाप, पोलीस अंमलदार चारूदत्त निकम, भगवान जाधव, भरत राऊत आणि महिला पोलीस अंमलदार सविता कदम यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. त्यांच्या या कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पथकाने ही धाडसी कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरातील व्यापारी आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!