कळवण भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक ८ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ; नाशिक एसीबीची धडक कारवाई!

न्यायालयीन आदेशाच्या मोजणीचा अहवाल देण्यासाठी मागितली होती लाच; ३ हजारांचा पहिला हप्ता घेताना सापळा यशस्वी

लाल 🚨 दिवा कळवण, दि..१;- ऑगस्ट:न्यायालयाच्या आदेशानुसार केलेल्या जमिनीच्या मोजणीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी ८ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. विजय हनुमंत गवळी (वय ४३) असे या लाचखोर लिपिकाचे नाव असून, ३ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना त्याला कळवण येथील भूमी अभिलेख कार्यालयातच बेड्या ठोकण्यात आल्या. या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या विक्रीसंदर्भात कळवण न्यायालयात दिवाणी खटला सुरू होता. न्यायालयाने २५ नोव्हेंबर २०२४ रोजी भूमी अभिलेख कार्यालयाला संबंधित जमिनीची मोजणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार, आरोपी लिपिक विजय गवळी याने २१ मे २०२५ रोजी मोजणीचे काम पूर्ण केले.

मात्र, हा महत्त्वाचा मोजणी अहवाल उपाधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयाकडे सादर करण्याच्या मोबदल्यात गवळी याने तक्रारदाराकडे ८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. गवळीच्या या मागणीमुळे संतप्त झालेल्या ३९ वर्षीय तक्रारदाराने थेट नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.

एसीबीच्या पथकाने ३० जुलै रोजी या तक्रारीची गुप्तपणे पडताळणी केली. त्यावेळी, “अहवाल पाठवण्यापूर्वी ३ हजार रुपये द्या आणि काम झाल्यावर उरलेले पैसे द्या,” अशी मागणी गवळीने केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, एसीबीने आज, ३१ जुलै रोजी भूमी अभिलेख कार्यालयात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ३ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने गवळीच्या मुसक्या आवळल्या. त्याला रंगेहाथ पकडण्यात आल्याने त्याची चांगलीच भंबेरी उडाली.

या प्रकरणी गवळीविरोधात कळवण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तसेच, त्याच्या नाशिक येथील घराची झडती घेण्यात येत असून, त्याचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे आणि अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली.

नागरिकांना आवाहन

कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टोल-फ्री क्रमांक: १०६४

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!