!! ब्रेकिंग न्यूज !!,पंचवटीत भरदिवसा धाडसी घरफोडी; चोरट्यांचे पोलिसांना खुले आव्हान!

भाजीपाला विक्रेत्याच्या घरातून साडेपाच लाखांहून अधिक किमतीचे सोने लंपास; परिसरात खळबळ

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. १४ (प्रतिनिधी): शहरात चोरट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून, आता त्यांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पंचवटीतील समर्थनगरसारख्या गजबजलेल्या परिसरात भरदुपारी एका बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५ लाख ६३ हजार ७५० रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याप्रकरणी भाजीपाला विक्रेते ऋषीकेश मधुकर दराडे (वय ३०, रा. आर. के. प्राईड अपार्टमेंट, समर्थनगर) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषीकेश दराडे हे आपल्या कुटुंबासह समर्थनगर येथील आर. के. प्राईड अपार्टमेंटमध्ये राहतात. मंगळवारी (दि. १२) दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा कशाच्या तरी सहाय्याने तोडून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी घरातील कपाट उचकटून त्यात ठेवलेले फिर्यादी व त्यांच्या सासूबाईंचे मौल्यवान सोन्याचे दागिने चोरून नेले. यामध्ये महागडे नेकलेस, सोन्याची पोत, अंगठ्या, नथी, कानातील झुबे, सोन्याच्या चैन अशा एकूण ५,६३,७५० रुपये किमतीच्या दागिन्यांचा समावेश आहे. दराडे कुटुंबीय घरी परतल्यावर त्यांना घराचा दरवाजा उघडा व आतील सामान अस्ताव्यस्त दिसले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र आर. पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ आणि पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ) आणि ३३१ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण पुढील तपास करत आहेत. भरदिवसा झालेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!