जनआक्रोशाने नाशिक हादरले! चिमुकल्या आयुषच्या न्यायासाठी हजारो नागरिक रस्त्यावर; वनविभागाला घातला घेराव!
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.२०:– (विशेष प्रतिनिधी): “एक, दोन, तीन, चार… वनविभागाचा धिक्कार!”, “आयुषला न्याय मिळालाच पाहिजे!”, “झोपी गेलेल्या प्रशासनाला जागं करा!”… अशा गगनभेदी घोषणा, डोळ्यांतील अश्रू आणि काळजात धगधगणारा संताप घेऊन आज हजारो नागरिकांचा महासागर नाशिकच्या रस्त्यावर उतरला. निमित्त होतं, नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात क्रूरपणे बळी ठरलेल्या चिमुकल्या आयुष भगत याच्या न्यायासाठी आणि संपूर्ण पंचक्रोशीच्या सुरक्षेसाठी काढण्यात आलेल्या विराट धडक मोर्चाचे.

वडनेर दुमाला येथून निघालेल्या या मोर्चात देवळाली गाव, विहितगाव, पिंपळगाव खांब, दाढेगाव, पाथर्डीसह आसपासच्या गावातील आबालवृद्धांनी प्रचंड संख्येने हजेरी लावली. प्रत्येक चेहरा काळवंडलेला होता, प्रत्येक हृदयात वेदना होती आणि प्रत्येक आवाजात व्यवस्थेविरोधातील चीड होती. हा मोर्चा केवळ एका निष्पाप बाळाच्या आठवणीसाठी नव्हता, तर बिबट्याच्या दहशतीखाली जगत असलेल्या हजारो कुटुंबांच्या अस्तित्वाचा लढा होता.
दहशतीचे सावट, प्रशासनाची दिरंगाई !
गेल्या कित्येक दिवसांपासून या संपूर्ण परिसरात बिबट्याने अक्षरशः थैमान घातले आहे. अनेक जनावरांचा फडशा पाडल्यानंतरही वनविभागाने केवळ कागदी घोडे नाचवण्यापलीकडे काहीही केले नाही. याच अक्षम्य दिरंगाईचा परिणाम म्हणून एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा दिवा विझला, एका आईच्या कुशीतून तिचा ‘आयुष’ कायमचा हिरावला गेला. या हृदयद्रावक घटनेनंतर तरी प्रशासन जागे होईल, अशी अपेक्षा होती. पण तसे न झाल्याने नागरिकांच्या सहनशीलतेचा अखेर आज स्फोट झाला.
“आमचं पोरगं गेलं, आता तुमची बारी हाय का?”
“रोज संध्याकाळी काळजाचं पाणी पाणी होतंय. पोरं घराबाहेर खेळायला घाबरत्यात, आम्ही शेतात जायला तयार नाही. अधिकारी येतात, फोटो काढतात आणि निघून जातात. पिंजरा लावलाय, पण त्यात कोंबडी हाय, बिबट्या नाही. आमचं पोरगं गेलं, आता अजून किती बळी गेल्यावर ह्यांना जाग येणार?”, मोर्चात हंबरडा फोडणाऱ्या एका मातेचा हा संतप्त सवाल थेट काळजाला भिडणारा होता.
वनविभागाला घेराव, आश्वासनांवर विश्वास नाही !
मोर्चा वनविभागाच्या कार्यालयावर धडकताच संतप्त जमावाने अधिकाऱ्यांना धारेवर धरले. “तो नरभक्षक बिबट्या जेलबंद कधी होणार?”, “आयुषच्या कुटुंबाला न्याय कधी देणार?”, “फक्त आश्वासनं देणार की कारवाई पण करणार?” अशा प्रश्नांच्या भडीमाराने अधिकाऱ्यांची बोबडी वळली. प्रचंड दबावानंतर अधिकाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी पथके वाढवून तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
मात्र, आता या पोकळ आश्वासनांवर विश्वास ठेवण्यास गावकरी तयार नाहीत. जोपर्यंत तो नरभक्षक बिबट्या पिंजऱ्यात अडकत नाही आणि आमच्या मुला-बाळांना सुरक्षित वाटत नाही, तोपर्यंत आमचा हा लढा थांबणार नाही, असा ठाम निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे. आजचा मोर्चा ही केवळ एक सुरुवात आहे, जर प्रशासनाने आताही डोळे उघडले नाहीत, तर याहून तीव्र आंदोलन छेडण्याचा खणखणीत इशारा पंचक्रोशीने दिला आहे.








