नाशिक पोलिसांची हिमाचलमध्ये धडक; पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने गुंडा विरोधी पथकाची धाडसी कारवाई!
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.२५:- शहराला हादरवून सोडणाऱ्या २०१७ मधील किरण निकम हत्याकांडातील मुख्य सूत्रधार आणि तब्बल आठ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा कुख्यात गुन्हेगार विकास उर्फ विक्की पंजाबी याच्या अखेर नाशिक शहर गुंडा विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. एखाद्या थरारपटालाही लाजवेल अशा पाठलागानंतर त्याला थेट हिमाचल प्रदेशातील कुल्लूच्या दुर्गम पहाडी भागातून अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, ‘खलनायक’ या टोपण नावाने तो तिथे ओळख बदलून हॉटेल व्यवसाय करत होता.
काय होते प्रकरण?
१८ मे २०१७ रोजी पंचवटीतील नवनाथ नगर परिसरात वर्चस्वाच्या लढाईतून निकम गँगच्या किरण राहुल निकम याची उघडे गँगने भररस्त्यात निर्घृण हत्या केली होती. गणेश उघडे, बंडू मुर्तडक यांच्यासह टोळीने किरण निकमवर धारदार शस्त्रांनी सपासप वार करून त्याला संपवले होते. या प्रकरणात पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील इतर आरोपींना न्यायालयाने मे २०२३ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली, मात्र गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असलेला विकास उर्फ विक्की पंजाबी तेव्हापासून फरार होता.
पोलिसांनी असा रचला सापळा
आठ वर्षे उलटूनही विक्की पोलिसांच्या हाती लागत नसल्याने नाशिक शहर पोलीस आयुक्त, श्री. संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्याला तात्काळ अटक करण्याचे विशेष आदेश गुंडा विरोधी पथकाला दिले होते. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासाची चक्रे फिरवली.
तपासात विक्की मूळचा चंदीगडचा असल्याची माहिती मिळाली. गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, ज्ञानेश्वर मोहिते यांनी आपल्या पथकासह तात्काळ चंदीगड गाठले, पण तोपर्यंत तो तिथूनही निसटला होता. मात्र, पोलिसांनी हार मानली नाही. चंदीगडमध्ये गोपनीय तपास केला असता, विक्की पंजाबी आता ‘खलनायक’ म्हणून ओळखला जातो आणि तो हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील ‘पुलगा’ या दुर्गम गावात हॉटेल चालवत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली.
अन्… ‘खलनायक’ सापडला!
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, क्षणाचाही विलंब न करता, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे यांच्या पथकाने थेट हिमाचल प्रदेश गाठले. २३ ऑगस्टच्या रात्री घनदाट अंधारात आणि थंडगार पहाडी परिसरात शोधमोहीम राबवत पहाटे ४ वाजता पथकाने त्याच्या हॉटेलवर छापा टाकला. गाढ झोपेत असलेल्या विक्की उर्फ ‘खलनायक’ याला नाशिक पोलिसांनी शिताफीने उचलले. सुरुवातीला त्याने ओळख लपवण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या खाक्यापुढे त्याचे काही चालले नाही आणि त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
आरोपीला कुल्लू न्यायालयातून चार दिवसांचा ट्रान्झिट रिमांड घेऊन नाशिकला आणण्यात आले आहे. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त श्री. किरणकुमार चव्हाण आणि सहा. पोलीस आयुक्त श्री. संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाने पार पाडलेल्या या धाडसी कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या अटकेमुळे आठ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित अध्यायावर अखेर पडदा पडला आहे.







