२०२४ ची भरती दाखवली चक्क २०१४ मध्ये; २ कोटी लाटण्यासाठी ‘टाइम ट्रॅव्हल’ करणाऱ्या संस्थाचालकाचा नाशिक पोलिसांनी वाजवला बँड ! :-
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.१४:- विशेष गुन्हे प्रतिनिधी | नाशिक शाळा म्हणजे विद्येचे मंदिर असते, पण काही ‘महाभागां’साठी ती तिजोरीवर डल्ला मारण्याची सोन्याची खाण झाली होती! विज्ञानालाही लाजवेल अशा पद्धतीने चक्क २०२४ मधील भरती थेट २०१४-१७ मध्ये नेऊन दाखवणाऱ्या आणि शासनाचे दोन कोटी रुपये लाटण्याचा मनसुबा रचणाऱ्या एका संस्थाचालकाचा डाव नाशिक पोलिसांनी कोर्टात पुरता उधळून लावला आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यातील संशयित आरोपी तथा अंतुर्ली (जि. जळगाव) येथील एम. एफ. तराळ विद्यालयाचे सचिव विनोद रामदास तराळ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जे. जामदार यांनी अक्षरशः कचऱ्याच्या टोपलीत टाकला आहे. नाशिक रोड पोलिसांनी गोळा केलेले भक्कम पुरावे पाहता न्यायालयाने आरोपीला कोणताही दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला.
२०२४ चे कर्मचारी २०१४ मध्ये? वाह रे संस्थाचालक
नाशिक रोड पोलिसांच्या तपास पथकाने न्यायालयात असा काही चक्रव्यूह रचला की आरोपीच्या वकिलांची डाळ शिजू शकली नाही. अभियोग पक्षाने कोर्टात उघड केले की, तराळ यांनी आपल्या शाळेतील १७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या प्रत्यक्षात २०२४ मध्ये केलेल्या असताना, कागदोपत्री मात्र त्या २०१४ ते २०१७ दरम्यान दाखवल्या. उद्देश एकच— शासनाकडून तब्बल दोन कोटी रुपयांहून अधिकची थकबाकी लाटायची! पण खाकी वर्दीच्या चाणाक्ष नजरेतून हे सुटू शकले नाही. तत्कालीन मुख्याध्यापकांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात स्पष्टच सांगितले, “मी २०१९ ते २०२२ शाळेत होतो, पण हे १७ चेहरे मला शाळेच्या गेटवरही कधी दिसले नाहीत!” मुख्याध्यापकांच्या या एकाच जबाबाने आरोपीच्या खोटेपणाचा फुगा कोर्टात फुटला.वडिलोपार्जित जमीन विकली अन
या घोटाळ्यात माणुसकीला काळिमा फासणारा प्रकारही पोलिसांनी समोर आणला. एका गरीब शिक्षकाला नोकरीचे आमिष दाखवून त्याच्याकडून तब्बल २५ लाख रुपये उकळण्यात आले. बिचाऱ्या शिक्षकाने ही रक्कम उभी करण्यासाठी आपली वडिलोपार्जित शेतजमीन विकली होती. गरिबांच्या पोटावर पाय देऊन आणि शिक्षण विभागातील नोंदी गायब करून स्वतःचे खिसे भरणाऱ्या या ‘शिक्षणसम्राटां’ना नाशिक पोलिसांनी न्यायालयात उघडे पाडले.
खाकीचा दणका, आता पळता भुई थोडी!
नाशिक विभागातील तब्बल ९६ बनावट नियुक्त्यांच्या मुळाशी जाऊन पोलिसांनी ज्या चिकाटीने कागदपत्रे तपासली, त्याचे फळ म्हणजे तराळ यांचा जामीन फेटाळला जाणे होय. जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील बनावटगिरीचा पर्दाफाश करत पोलिसांनी कोर्टाला दाखवून दिले की हा साधासुधा गुन्हा नसून पद्धतशीरपणे सरकारी तिजोरीवर टाकलेला दरोडा आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत “सत्यमेव जयते” आणि “प्रामाणिकपणा हेच सर्वोत्तम धोरण” शिकवणाऱ्या संस्थाचालक महाशयांनी सरकारी तिजोरीला स्वतःचे वैयक्तिक ‘एटीएम’ समजण्याची गफलत केली. २०२४ मधून थेट २०१४ मध्ये उडी मारून ‘टाइम ट्रॅव्हल’चे जनक बनू पाहणाऱ्या तराळ सरांचा हा गृहपाठ नाशिक पोलिसांनी कोर्टात ‘नापास’ ठरवला आहे. आता अटकपूर्व जामीन हुकल्यामुळे संस्थेच्या वातानुकूलित कार्यालयाऐवजी पोलिसांच्या ‘खाकी पाहुणचारात’ हजेरी लावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे!






