सुला रोडवरील ‘त्या’ थरारक मृत्यूप्रकरणी आमदार सीमा हिरेंचा विधानसभेत ‘एल्गार’; नशबाज चालकाला पाठीशी घालणाऱ्या पोलिसाचे तडकाफडकी निलंबन, मंत्री भोयर म्हणाले, ‘कोणालाही सोडणार नाही!’

सुला वाईन रोडवरील ‘तो’ जीवघेणा थरार! दोषींच्या मुसक्या आवळणारच; राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची विधानसभेत ‘गर्जना’

नाशिकच्या ‘हिट अँड रन’ प्रकरणात सरकार आक्रमक; तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसाचे निलंबन, मुख्यमंत्र्यांची थेट नजर!

लाल 🚨 दिवा-नाशिक मुंबई ,दि.२५:- विशेष प्रतिनिधी नाशिकच्या पर्यटनाचे केंद्रबिंदू असलेल्या गोवर्धन ते सुला वाईन रस्त्यावर ८ मार्च रोजी घडलेल्या अंगावर काटा आणणाऱ्या अपघाताचे पडसाद थेट विधानभवनात उमटले आहेत. “नशेत धुंद होऊन निष्पापांचा जीव घेणाऱ्या धनदांडग्यांची आता गय केली जाणार नाही, दोषी कितीही मोठा असो, त्याच्या मुसक्या आवळणारच!” असा खणखणीत इशारा राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत दिला आहे.

८ मार्च २०२५ ची ती काळरात्र… नाशिकचा गोवर्धन ते सुला वाईन रस्ता नेहमीप्रमाणे गजबजलेला होता. पाम स्प्रिंग हॉटेलसमोर नशेच्या अमंली पदार्थांचे सेवन करून तर्रर्र असलेल्या एका तरुणाने आपली कार बेफाम वेगाने हाकली. वेगाची नशा आणि ड्रग्जचा अंमल याच्या भरात त्याने रस्त्यालगत असलेल्या एका निष्पाप व्यक्तीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, संबंधित व्यक्तीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण नाशिक हादरले होते.

आमदार सीमा हिरे आक्रमक

या प्रकरणी सुरुवातीला तपासात दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास येताच, नाशिकच्या आमदार सीमा हिरे यांनी विधानसभेत प्रशासनाला धारेवर धरले. “नाशिकच्या रस्त्यावर नशबाज तरुणाईचा नंगानाच सुरू असताना आणि निष्पापांचे बळी जात असताना पोलीस काय करत आहेत?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी लावून धरली.

आमदार सीमा हिरे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन खुद्द मुख्यमंत्री यामध्ये लक्ष घालत आहेत. इतकेच नव्हे तर, तपासात दिरंगाई करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

“रस्त्यावर निष्पापांचे रक्त सांडणाऱ्यांना कायद्याचा धाक असायलाच हवा. या गुन्ह्यात जे जे सहभागी असतील, मग ते प्रत्यक्ष गुन्हेगार असोत किंवा त्यांना पाठीशी घालणारे असोत, कोणालाही सोडले जाणार नाही. सखोल चौकशी करून सर्वांवर कठोर कारवाई होईल,” अशी ग्वाही डॉ. भोयर यांनी दिली.

नाशिककरांच्या सुरक्षिततेसाठी आणि ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’च्या वाढत्या घटनांना चाप लावण्यासाठी पोलीस आता काय पावले उचलतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!