रक्तरंजित ‘रूंघटा’ फाईल: मजुराचा जीव घेणारे ‘मोठे मासे’ गळाला कधी लागणार? सुपरवायझर आणि कंत्राटदाराला बेड्या, मुख्य सूत्रधार मात्र ‘फरार’!

■ पोलिसांच्या कारवाईवर संशय: केवळ ‘छोट्या माशां’ची शिकार करून रूंघटा बंधूंना पळून जाण्यासाठी ‘सेफ पॅसेज’?

■ नाशिक हादरले: आरडी सर्कल दुर्घटनेप्रकरणी न्यायालयात २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी; पण बिल्डर लॉबी भूमिगत!

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.२४ :-गोविंदनगर येथील आरडी सर्कलवर (टेक वन) निष्पाप मजुराचा बळी गेल्यानंतर अखेर मुंबई नाका पोलिसांना जाग आली आहे. मात्र, ही जाग ‘अर्थपूर्ण’ उशिरा आल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. मजुराच्या रक्ताने माखलेल्या या प्रकरणात पोलिसांनी डोळ्यात धूळफेक करत सुपरवायझर आणि कंत्राटदार अशा ‘छोट्या माशां’ना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी (PCR) सुनावली असली तरी, या मृत्यूचे तांडव ज्यांच्या निष्काळजीपणामुळे घडले, ते ‘ललित रूंघटा ग्रुप’चे सर्वेसर्वा आणि रूंघटा बंधू मात्र पोलिसांच्या नाकाखालून ‘फरार’ झाले आहेत.

हे ‘अटकसत्र’ की ‘नाटकसत्र’?

मयत नागेंद्र यादव (२४) याचा जीव गुदमरून गेला आणि सुयश हॉस्पिटलमध्ये दोन मजुर मृत्यूशी झुंज देत आहेत. असे असताना, या घटनेला जबाबदार असणाऱ्या मुख्य बिल्डरला अटक न करता, पोलिसांनी केवळ सुपरवायझर आणि लेबर कॉन्ट्रॅक्टरला गजाआड केले आहे. नाशिककरांच्या मनात प्रश्न उभा राहिला आहे की, बिल्डरला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी हा वेळ दिला जातोय का?

‘सेफ्टी पर्पल’चे उल्लंघन आणि मनुष्यवध:

बांधकाम साईटवर ‘सेफ्टी पर्पल’ मानकांचे पालन न करणे आणि मजुरांना मृत्यूच्या दाढेत ढकलणे हा सरळसरळ मनुष्यवधाचा प्रकार आहे. कायद्यानुसार, ज्यांच्या फायद्यासाठी हे काम चालले होते, त्या मालकांवर (रूंघटा बंधू) आधी बेड्या पडणे अपेक्षित होते. मात्र, पोलीस तपास अधिकारी गायकवाड आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाची दिशा फिरवत मुख्य आरोपींना ‘मोकळे रान’ दिल्याचे बोलले जात आहे.

अटक करण्यात आलेल्या सुपरवायझर आणि कंत्राटदाराला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांना २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता कोठडीत हे आरोपी काय कबुली देतात आणि पोलिसांच्या तपासाची सुई फरार रूंघटा बंधूंकडे वळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बिल्डर ‘नॉट रिचेबल’ की ‘आउट ऑफ कव्हरेज’?

घटना घडल्यापासून ललित रूंघटा ग्रुपचे संचालक आणि भागीदार नॉट रिचेबल आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, बड्या राजकीय वरदहस्तामुळे पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास टाळाटाळ करत आहेत. एकीकडे गरीब मजुराच्या घरात स्मशानशांतता आहे, तर दुसरीकडे बिल्डर लॉबी वकिलांच्या फौजफाट्यासह स्वतःची कातडी वाचवण्यासाठी पळापळ करत आहे.

जनतेचा सवाल:

केवळ कर्मचाऱ्यांना अटक करून पोलीस हे प्रकरण दडपणार आहेत का? की फरार रूंघटा बंधूंना शोधून नाशिक पोलीस आपली खाकी वर्दीवरील डाग पुसणार?

ठळक अपडेट्स :

अटक: साईट सुपरवायझर आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर.

न्यायालयीन आदेश: २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी (PCR).

फरार: रूंघटा बंधू (मुख्य बिल्डर).

जखमींची स्थिती: सुयश हॉस्पिटलमध्ये अद्याप चिंताजनक.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!