३७ वर्षांच्या ‘सेवे’त कमवली सात पिढ्यांची ‘माया’; ‘घर का भेदी’नेच लावली लंका !
लाल 🚨 दिवा-नाशिक ,२४:-: विशेष प्रतिनिधी सध्या नाशिक महानगरपालिकेच्या अंधाऱ्या कॉरिडॉरमध्ये आणि बिल्डरांच्या चकाचक केबिन्समध्ये एकच डायलॉग गुंजतोय… “इतने सन्नाटे में क्यूं भाई?” पण हे सन्नाटे आता वादळापूर्वीची शांतता असल्याचे स्पष्ट झाले आहे. मनपाच्या बांधकाम आणि नगररचना विभागात तब्बल ३७ वर्षे ‘राज’ करणाऱ्या एका बड्या ‘साहेबां’चे कारनामे आता एसीबीच्या (ACB) टेबलावर पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, “अपने ही गिराते है नशेमन पे बिजलियां” या उक्तीप्रमाणे साहेबांच्याच जवळच्या एका नातेवाईकाने पुराव्यांची ४१ पानी ‘कादंबरी’ उघडून दिल्याने “कोण आहे तो?” अशी कुजबूज सुरू झाली आहे.
“नाम तो सुना होगा?”
हे ‘साहेब’ आता निवृत्त झाले आहेत, पण त्यांचा ‘रुबाब’ आजही तसाच आहे. नगररचना विभागात असताना शहराचा नकाशा बदलण्याची ताकद त्यांच्या पेनमध्ये होती. पण तक्रारीनुसार, त्यांनी शहराचा नकाशा बदलण्याआधी स्वतःच्या ‘आर्थिक भूगोला’चा नकाशा बदलला. “रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है…”अशा थाटात वावरणाऱ्या या साहेबांनी बांधकाम परवानग्या आणि पूर्णता दाखल्यांच्या (Completion Certificate) बदल्यात काय काय ‘जमा’ केले, याची यादी वाचून सर्वसामान्यांचे डोळे फिरतील.
“मेरे पास बंगला है, गाडी है, बँक बॅलन्स है… तुम्हारे पास क्या है?“
तक्रारदाराने सादर केलेल्या यादीनुसार, साहेबांकडे काय नाही?
पेट्रोल पंप (तो ही स्वतःच्याच मालकीच्या जागेवर!)
शहराच्या मोक्याच्या ठिकाणी अर्धा डझनहून अधिक आलिशान दुकाने (शॉपिंग कॉम्प्लेक्स).
जेलरोडपासून ते मखमलाबादपर्यंत आणि स्टार झोनपासून ते एमआयडीसीपर्यंत पसरलेले जमिनींचे तुकडे.
फ्लॅट्स, बंगले आणि पेंटहाऊस…
पण गंमत अशी की, यातील बहुतांश मालमत्ता साहेबांनी स्वतःच्या नावावर घेतल्याच नाहीत. “हम साथ साथ है” म्हणत त्यांनी पत्नी, मुले, मेव्हणे आणि अगदी जुन्या सहकाऱ्यांच्या नावावर हे ‘बेनामी’ साम्राज्य उभे केले. जणू काही **“तेरा माल मेरा, और मेरा माल… वो भी मेरा!”
नगररचनेचा ‘ज्योतिषी’!
या साहेबांची कामाची पद्धत मोठी युनिक होती. महापालिकेत रस्ता कोठून जाणार? आरक्षण (Reservation) कोठे पडणार? झोन कोणता बदलणार? हे त्यांना आधीच माहित असायचे. मग काय, “जो जिता वही सिकंदर” ! रस्ता होण्याआधीच ती जमीन आपल्या नातेवाईकांच्या नावे कवडीमोल भावात घ्यायची आणि नंतर तीच जमीन महापालिकेला देऊन कोट्यवधी रुपयांचा TDR (विकास हक्क) आणि मोबदला लाटायचा. म्हणजेच, “चित भी मेरी, पट भी मेरी!”
निवडणुकीत ‘सत्य’ लपवले?
निवृत्तीनंतर साहेबांना समाजसेवेचे डोहाळे लागले आणि त्यांनी नुकतीच मनपा निवडणुकीची तयारीही केली. पण उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात (Affidavit) यातील अर्धी माया गायब! जणू काही “कुछ तो गडबड है दया…” अशी शंका यावी इतकी ही लपवाछपवी.
“पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त…”
तक्रारदाराने केवळ आरोप केले नाहीत, तर जमिनीचे गट नंबर, खरेदी खते आणि बँक व्यवहारांचा कच्चा चिठ्ठाच एसीबीला दिला आहे. त्यामुळे आता या ‘साहेबां’च्या आणि त्यांच्याशी हातमिळवणी असलेल्या बड्या बिल्डरांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) यावर काय ॲक्शन घेणार? साहेबांच्या ‘लंके’ला आग लागणार का? की नेहमीप्रमाणे “तारीख पे तारीख”पडणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तोपर्यंत नाशिककर आणि मनपा वर्तुळात एकच प्रश्न – “अरे ओ सांबा… कितणे आदमी थे?” (म्हणजेच किती भागीदार होते?)
(टीप: सदर वृत्तातील पात्रे काल्पनिक नसून नाशिकच्या वास्तवाशी भयंकर साधर्म्य दर्शवणारी आहेत. ज्यांना आपला उल्लेख असल्याचा संशय येईल, त्यांनी आरशात बघावे ! )







