धोत्रे खून प्रकरणातील मुख्य मारेकरी अखेर गजाआड; गुंडा विरोधी पथकाच्या धाडसी आणि थरारक कामगिरीने गुन्हेगारी विश्वात उडाली खळबळ!
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. ०६:-कायद्याचे हात किती लांब असतात, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आणून देत नाशिक शहर पोलिसांनी आपल्या कर्तव्यदक्षतेचा आणि अदम्य साहसाचा परिचय दिला आहे. शहरात गाजलेल्या धोत्रे खून प्रकरणातील मुख्य मारेकरी, जो गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन थेट मध्यप्रदेशात लपून बसला होता, त्याला गुंडा विरोधी पथकाने एका धाडसी आणि थरारक कारवाईत जेरबंद केले आहे. सिनेमाच्या दृश्यालाही लाजवेल अशा पाठलागानंतर आरोपीला शेतातून पकडण्यात आले असून, नाशिक पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
२२ ऑगस्ट रोजी नांदूर नाका परिसरात अत्यंत क्षुल्लक कारणावरून राहुल धोत्रे या तरुणावर उद्धव निमसे आणि त्याच्या साथीदारांनी अमानुष हल्ला केला होता. लाकडी दांडे आणि चाकूने केलेल्या या हल्ल्यात राहुलचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या निर्घृण हत्येप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. इतर आरोपींना अटक झाली असली तरी, या हल्ल्यातील मुख्य सूत्रधार सचिन दहिया हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याने पोलिसांना गुंगारा देत थेट आपले राज्य, मध्यप्रदेश गाठले होते.
पोलिसांनी विणले गुप्त माहितीचे जाळे!
हा गुन्हा अत्यंत गंभीर असल्याने पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णीक यांनी आरोपीला कोणत्याही परिस्थितीत आणि तात्काळ अटक करण्याचे आदेश गुंडा विरोधी पथकाला दिले होते. त्यानुसार, सहा. पोलीस आयुक्त श्री. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेण्यासाठी गोपनीय खबऱ्यांचे जाळे विणले. दिवस-रात्र एक करून, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू असतानाच पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी आणि प्रदिप ठाकरे यांना सचिन दहिया हा मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यात ओळख लपवून मार्बल फिटरचे काम करत असल्याची पक्की खबर मिळाली.
थरार… मध्यप्रदेशच्या शेतातून थेट बेड्यांपर्यंत!
माहिती मिळताच, क्षणाचाही विलंब न लावता गुंडा विरोधी पथकाचे एक जिगरबाज पथक मध्यप्रदेशात रवाना झाले. सपोनि ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सतना जिल्ह्यात पोहोचून वेषांतर करून आरोपीची माहिती काढण्यास सुरुवात केली. आरोपी नागौद परिसरातील गिंजारा गावात नातेवाईकाकडे राहत असल्याची खात्री होताच, पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचला.
मात्र, अत्यंत चलाख असलेल्या सचिन दहियाला पोलिसांची चाहूल लागली. क्षणातच तो जीन्याच्या आकांताने गावाबाहेरील शेताच्या दिशेने धूम ठोकली. अनोळखी भूमी, अनोळखी परिसर… पण नाशिक पोलिसांच्या जिगरबाज पथकाने हार मानली नाही. त्यांनी आरोपीचा पाठलाग सुरू केला. सुमारे अर्धा किलोमीटरच्या थरारक पाठलागानंतर, अखेर पोलिसांनी धाडसाने सचिन दहियावर झडप घालून त्याला जेरबंद केलेच! त्याच्या अटकेने धोत्रे कुटुंबीयांना न्याय मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
ही अभिमानास्पद कामगिरी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णीक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण व सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संदीप मिटके यांच्या यशस्वी मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सपोनि ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे आणि सुनिता कवडे यांच्या पथकाने पार पाडली. या कारवाईमुळे नाशिक पोलीस दल गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.







