जेव्हा देवाच्या घरात अंधार पसरला, तेव्हा पोलीस आशेचा किरण बनून आले; मुकुट परत, भाविकांच्या चेहऱ्यावर हसू आले.
लाल 🚨 दिवा-नाशिकरोड, दि. ०६ नोव्हेंबर: “देव तारी त्याला कोण मारी,” पण “देवाच्याच घरात चोरी करणाऱ्याला पोलीस काही सोडीत नाही,” याचा प्रत्यय नाशिकरोडकरांनी घेतला आहे. भरदिवसा मंदिरातून मारुतीरायाच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट लंपास करून पोलिसांना आव्हान देणाऱ्या चोराला, नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने अवघ्या चोवीस तासांच्या आत शिताफीने जेरबंद केले आहे. या कौतुकास्पद कामगिरीमुळे केवळ एका गुन्ह्याचा छडा लागला नाही, तर हजारो भाविकांच्या श्रद्धेला लागलेला धक्काही पुसला गेला आहे. परिसरात पोलिसांच्या या तत्परतेचे कौतुक होत असून, “अखेर देवाचा मुकुट देवाकडे परतणार,” या भावनेने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दिनांक ०४ नोव्हेंबर २०२५, सकाळची वेळ. नाशिकरोडच्या मालधक्का परिसरातील मारुती मंदिर भाविकांच्या गर्दीने नेहमीप्रमाणे फुललेले. मंदिराचा दरवाजा उघडा होता, आत-बाहेर लोकांची वर्दळ होती. याच गर्दीचा आणि उघड्या दरवाजाचा फायदा एका नराधमाने घेतला. अनेकांसाठी श्रद्धास्थान असलेल्या, संकटमोचक मानल्या जाणाऱ्या मारुतीरायाच्या मूर्तीवरचा चांदीचा मुकुटच त्याने लंपास केला. जेव्हा ही गोष्ट लक्षात आली, तेव्हा परिसरात एकच खळबळ उडाली. ही केवळ चोरी नव्हती, तर तो थेट नागरिकांच्या श्रद्धेवर केलेला आघात होता. भाविकांच्या भावना दुखावल्या होत्या. “देवालाही न सोडणाऱ्या चोराला देवच शिक्षा देईल,” अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ अ नुसार गुन्हा (गुरनं ५६१/२०२५) दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या आदेशानंतर नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र सपकाळे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. बडेसाब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक कामाला लागले. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात पोहवा विशाल पाटील, महेंद्र जाधव, सागर आडणे, अरुण गाडेकर आणि योगेश रानडे यांचे पथक तयार झाले. वरिष्ठांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या – “रेकॉर्डवरील प्रत्येक गुन्हेगाराला तपासा, प्रत्येक संशयितावर नजर ठेवा, पण मुकुट शोधून काढाच!”
पथकाने क्षणाचाही विलंब न लावता सूत्रे फिरवली. दिनांक ०५ नोव्हेंबर रोजी, सिन्नरफाटा आणि शिखलकर वस्ती परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती सुरू होती. पोलिसांचा प्रत्येक कोपऱ्यावर खडा पहारा होता. अशातच, एका गोपनीय खबऱ्याकडून पथकाला पक्की माहिती मिळाली. “केळकर वाडी परिसरात राखाडी रंगाचा शर्ट घातलेला एक संशयित इसम फिरत असून, त्याच्याकडे चोरीस गेलेला चांदीचा मुकुट आहे.”
माहिती मिळताच पथकाच्या अंगात वीज संचारली. त्यांनी तात्काळ केळकर वाडी परिसरात वेषांतर करून सापळा रचला. प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवली. काही वेळातच, खबऱ्याने वर्णन केलेला इसम त्या परिसरात आला. त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या, चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. पथकाने त्याला पळून जाण्याची कोणतीही संधी न देता, अत्यंत शिताफीने चारी बाजूंनी घेरले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या.
त्याची ओळख पटली – संकेत रामनाथ राऊत (वय २६, रा. देवळाली गाव, नाशिकरोड). त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे तब्बल ५०,००० रुपये किमतीचा, २८० ग्रॅम वजनाचा तोच चांदीचा मुकुट सापडला, जो त्याने मारुतीरायाच्या मूर्तीवरून चोरला होता.
पापाचा घडा अखेर भरला होता. ज्या संकटमोचक हनुमानाने रावणाच्या अहंकाराचा नाश केला, त्याच हनुमानाचा मुकुट चोरून कोणी सुटू शकेल का? पोलिसांच्या रूपाने जणू काही नियतीनेच आपला न्याय केला होता. चोराला त्याच्या कर्माची फळे मिळाली आणि देवाचा पवित्र मुकुट पुन्हा एकदा देवाच्या चरणी परतण्याचा मार्ग मोकळा झाला. हा केवळ पोलिसांचाच नव्हे, तर श्रद्धेचाही विजय होता.
या उल्लेखनिय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त श्री. किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती संगीता निकम यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या संपूर्ण गुन्हे शोध पथकाचे भरभरून कौतुक केले आहे. या कामगिरीने नाशिक पोलिसांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार विशाल पाटील करत आहेत.







