शहरात रात्रभर पोलिसांचा धडाका; अवैध शस्त्रे जप्त, मद्यपींनाही दणका!
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.४:- प्रतिनिधी:नाशिक शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असतानाच, पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक यांनी गुन्हेगारीचा समूळ नायनाट करण्यासाठी कडक पाऊले उचलली आहेत. आयुक्तांच्या एका आदेशाने संपूर्ण पोलीस दल रस्त्यावर उतरले आणि शहरात ‘कोंबिंग ऑपरेशन‘ राबवून गुन्हेगारांमध्ये अक्षरशः थरकाप उडवला. या धडक कारवाईत सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणारे, टवाळखोरी करणारे आणि कायदा हातात घेणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
टवाळखोरांचा सुळसुळाट मोडून काढला!
शहरातील प्रमुख चौक, गजबजलेले रस्ते आणि निर्जन ठिकाणी विनाकारण घोळके करून थांबणाऱ्या, मुलींची छेड काढणाऱ्या आणि नागरिकांना त्रास देणाऱ्या ५१६ टवाळखोरांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार थेट कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे टवाळखोरांना पळता भुई थोडी झाली.
शस्त्र बाळगणाऱ्या खतरनाक आरोपींना अटक!
पोलिसांनी केवळ टवाळखोरांवरच नव्हे, तर गंभीर गुन्हे करणाऱ्यांवरही लक्ष केंद्रित केले. या कारवाई दरम्यान, अवैध शस्त्रे बाळगून समाजात दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन खतरनाक आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून एक जीवघेणे पिस्तूल (अग्निशस्त्र) आणि एक जिवंत काडतूस असा एकूण ३१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
‘खुलेआम’ पार्टी करणाऱ्यांना तुरुंगाची हवा!
सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या आणि शांतता भंग करणाऱ्या २२ मद्यपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, कायद्याचा धाक काय असतो हे त्यांना दाखवून देण्यात आले आहे.
बालगुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष मोहीम
गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग ही चिंतेची बाब बनली आहे. यावर मात करण्यासाठी पोलिसांनी २७ विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेऊन त्यांचे विशेष समुपदेशन केले. त्यांना गुन्हेगारीच्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी आणि योग्य मार्गावर आणण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
कारवाईचा धडाका एका दृष्टिक्षेपात:
- टवाळखोरांवर कारवाई:५१६
- संशयित वाहनांची तपासणी:९१०
- तडीपार गुन्हेगार जेरबंद:०५
- अग्निशस्त्र बाळगणारे आरोपी:०२
- सार्वजनिक ठिकाणी मद्यपी:२२
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी मोहीम
पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त, गुन्हे शाखेचे अधिकारी आणि सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार या कारवाईत सहभागी झाले होते. या एकत्रित कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी विश्वाला मोठा हादरा बसला असून, नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे. आगामी काळातही अशीच धडक कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.







