दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. ४ ऑक्टोबर: येथील सिडको परिसरातील एका सार्वजनिक नवरात्र उत्सवात मुस्लिम समाजाविरोधात प्रक्षोभक आणि बदनामीकारक विधान केल्याप्रकरणी हर्षताई ठाकूर यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विधानामुळे दोन धर्मांमध्ये शत्रुत्वाची आणि द्वेषाची भावना निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सिडकोतील ‘महाकाली सोशल ग्रुप’च्या नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमात आरोपी हर्षताई ठाकूर यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात, “एक भी कटमुल्ला यहाँ पर दिखना नही चाहिए, ये त्योहार हिंदुओ का है, ये त्योहार हमारे सनातनी शेरणीओं का है, किसी मुल्ले की किसी ठुल्ले की, किसी लांडे की यहाँ पर जरूरत नाही है,” असे विधान केले.
त्यांच्या या भाषणामुळे राज्यातील तसेच नाशिक शहर व जिल्ह्यातील हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल आणि दुष्टपणाची भावना वाढेल, असा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई चेतन गेणू ठेपणे (वय ३९) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
त्यांच्या फिर्यादीवरून हर्षताई ठाकूर यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १९२ आणि २९९ अन्वये गुन्हा (गुरनं ६८३/२०२५) दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या घटनेमुळे शहरातील सामाजिक व राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.







