मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीपीआरआयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन; राज्याच्या औद्योगिक विकासात ऐतिहासिक झेप
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. १० (विशेष प्रतिनिधी): नाशिकच्या औद्योगिक शिरपेचात आज एक सोनेरी पान लिहिले गेले! शिलापूर येथे साकारलेल्या अत्याधुनिक केंद्रीय ऊर्जा अनुसंधान संस्थेच्या (सीपीआरआय) प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेमुळे (आरटीएल) केवळ उत्तर महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम भारताच्या औद्योगिक विकासाला ‘हाय व्होल्टेज’ चालना मिळाली आहे. विद्युत उपकरणांच्या किचकट तपासणीसाठी आता हैदराबाद किंवा भोपाळची वारी संपली असून, ‘मेक इन महाराष्ट्र’ला जागतिक दर्जाचे बळ मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर, मंत्री छगन भुजबळ, गिरीष महाजन आणि दादाजी भुसे यांच्यासह उद्योगजगतातील अनेक दिग्गज होते.
नाशिक होणार ‘उद्योगांचे जंक्शन’ – मुख्यमंत्री

उद्घाटन सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यातील महाराष्ट्राचे चित्रच उपस्थितांसमोर उभे केले. ते म्हणाले, “ही केवळ एक प्रयोगशाळा नाही, तर महाराष्ट्राच्या औद्योगिक क्रांतीचे पॉवरहाऊस आहे. यापूर्वी तपासणीच्या खर्चामुळे आणि वेळेमुळे अनेक उद्योजक मागे राहत होते, आता मात्र ट्रान्सफॉर्मरपासून ते ईव्ही चार्जिंग स्टेशनपर्यंत सर्व उपकरणांची निर्मिती आणि तपासणी महाराष्ट्रातच होईल.”
पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर हे इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे त्रिकेंद्र म्हणून उदयास येत असून, या प्रयोगशाळेमुळे ईव्ही उद्योगाला प्रचंड गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समृद्धी महामार्ग आणि वाढवण बंदर यामुळे नाशिक लवकरच देशातील ‘उद्योगांचे जंक्शन’ म्हणून ओळखले जाईल, असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
ऊर्जा क्षेत्रात २ लाख कोटींची गुंतवणूक, वीज होणार स्वस्त!
मुख्यमंत्र्यांनी यावेळी एक मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, “पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यात ऊर्जा क्षेत्रात २ लाख कोटी रुपयांची महागुंतवणूक करत आहोत. आमचे लक्ष्य केवळ वीज निर्माण करणे नाही, तर २०२५ ते २०३० पर्यंत दरवर्षी विजेचे दर २ टक्क्यांनी कमी करणे आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज आणि उद्योगांना २४ तास शाश्वत वीजपुरवठा हे आमचे वचन आहे.”
पश्चिम भारतासाठी वरदान – मनोहरलाल खट्टर

केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांनी या प्रयोगशाळेला ‘ऊर्जा क्षेत्राचा प्राण’ संबोधले. ते म्हणाले, “गुणवत्तापूर्ण उपकरणांशिवाय ऊर्जा क्षेत्र अपूर्ण आहे. नाशिकची ही प्रयोगशाळा पश्चिम भारतातील उद्योजकांसाठी एक वरदान ठरेल. महाराष्ट्राने स्मार्ट मीटरच्या वापरासाठी उचललेले पाऊल कौतुकास्पद असून इतर राज्यांसाठी मार्गदर्शक आहे.”
आंतरराष्ट्रीय कंपन्या नाशकात येणार – छगन भुजबळ

नाशिकचे सुपुत्र आणि मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकल्पामुळे नाशिकच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, “आतापर्यंत परदेशात उपकरणे निर्यात करण्यासाठी तपासणीचे नमुने दुसऱ्या राज्यात पाठवावे लागत होते. आता नाशिकमध्येच आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा उपलब्ध झाल्याने बहुराष्ट्रीय कंपन्या येथे आकर्षित होतील आणि नाशिक ‘इलेक्ट्रिक हब’ बनेल.”
काय आहे ही ‘पॉवरफुल’ प्रयोगशाळा ?
वेळ आणि पैशाची बचत: उद्योजकांना आता तपासणीसाठी हैदराबाद किंवा भोपाळला जाण्याची गरज नाही.
आत्मनिर्भर भारताला बळ: स्वदेशी उत्पादकांना जागतिक दर्जाच्या चाचणी सुविधा देशातच उपलब्ध.
अत्याधुनिक सुविधा: शॉर्ट सर्किट टेस्ट, स्मार्ट मीटर टेस्टिंग, ट्रान्सफॉर्मर ऑइल टेस्टिंग अशा अनेक प्रगत सुविधा एकाच छताखाली.
आंतरराष्ट्रीय मानके:येथे प्रमाणित झालेली उत्पादने जागतिक बाजारपेठेत सहज स्थान मिळवू शकतील.
औद्योगिक विकासाला चालना: कमी वेळेत आणि कमी खर्चात उत्पादन प्रमाणित झाल्याने नवीन उद्योगांना प्रोत्साहन मिळेल.
एकंदरीत, शिलापूर येथील ही प्रयोगशाळा केवळ एक इमारत नसून, महाराष्ट्राच्या आणि विशेषतः नाशिकच्या उज्ज्वल औद्योगिक भविष्याचा एक मजबूत पाया ठरली आहे, हे निश्चित







