अंबडमधील घरफोडीचा गुन्हा उघड, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची धडक कारवाई
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि.१०:-प्रतिनिधी:शहरात गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानंतर नाशिक शहर गुन्हे शाखा अधिकच सतर्क झाली आहे. गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने एका थरारक कारवाईत अंबड परिसरात झालेल्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार हा पूर्वी एका नामांकित वृत्तसंस्थेचा वार्ताहर असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी सापळा रचून त्याच्यासह एका साथीदाराला जेरबंद करत तब्बल ५ लाख ६९ हजार ५०० रुपये किमतीची ६७ ग्रॅम सोन्याची लगड हस्तगत केली आहे.
अंबड परिसरात राहणारे फिर्यादी आपल्या परिवारासह घरात असताना, एका अज्ञात चोराने घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील सोन्याची चेन आणि अंगठी लंपास केली होती. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, गुन्हे शाखा युनिट २ चे पथक समांतर तपासासाठी सक्रिय झाले.
गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी सपोनि हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक आरोपीचा शोध घेत असताना, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना त्यांच्या गोपनीय खबऱ्याकडून एक पक्की माहिती मिळाली. दिनांक ०९/०९/२०२५ रोजी एक इसम चोरीचे सोने विकण्यासाठी चुंचाळे शिवारातील सारूळ रस्त्यावर येणार असल्याची टीप मिळताच, पथकाने क्षणाचाही विलंब न लावता इनोव्हा रबर कंपनीजवळ सापळा रचला.
दुपारी साडेतीनच्या सुमारास संशयित इसम येताच पोलिसांनी झडप घालून त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने आपले नाव प्रशांत उर्फ बापू प्रकाश दुधे (वय ४४, रा. जुने सिडको) असल्याचे सांगून अंबड येथील घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरलेले सोने मित्र सूर्यकांत अहिरेराव (वय ४६, रा. जुने सिडको) याच्या मदतीने विकणार असल्याचेही त्याने सांगितले. पोलिसांनी तात्काळ सूर्यकांतलाही सिडको परिसरातून बेड्या ठोकल्या.
आरोपीचा पूर्वेतिहास धक्कादायक !
तपासात एक खळबळजनक माहिती समोर आली. मुख्य आरोपी प्रशांत दुधे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी अंबड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा (भा.दं.वि. कलम ३०७) गंभीर गुन्हा दाखल आहे. विशेष म्हणजे, तो पूर्वी ‘ANI न्यूज‘ या नामांकित वृत्तसंस्थेत वार्ताहर म्हणून काम करत होता. मात्र, नंतर त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते.
ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे सपोनि हेमंत तोडकर, सपोनि डॉ. समाधान हिरे, पोउनि मुक्तारखान पठाण, सपोउनि गुलाब सोनार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली. या कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे







