खंडणी विरोधी पथकाची बोरगड परिसरात धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या.
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. १०: शहरात गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने वावरत असलेल्या एका सराईत हद्दपार गुन्हेगाराला खंडणी विरोधी पथकाने अत्यंत शिताफीने जेरबंद केले आहे. रिंकेश गणेश सोलंकी (वय २५) असे या गुन्हेगाराचे नाव असून, त्याच्याकडून एक धारदार शस्त्र जप्त करण्यात आले आहे. हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात घुसलेल्या या गुन्हेगारामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती, मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने ती टळली आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सर्व पथकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. याच पार्श्वभूमीवर, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर आणि पोलीस अंमलदार राऊत यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून एक खळबळजनक माहिती मिळाली. माहितीनुसार, म्हसरूळ आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेला आणि शहरातून हद्दपार केलेला सराईत गुन्हेगार रिंकेश सोलंकी हा बोरगड परिसरात धारदार हत्यारासह फिरत होता.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करून खंडणी विरोधी पथकाने तात्काळ सापळा रचला. दिनांक ०९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास, बोरगड येथील ए.टी. पवार शाळेजवळच्या मोकळ्या मैदानात पथकाने अत्यंत सावधगिरीने आपली पोझिशन घेतली. काही वेळातच संशयित रिंकेश सोलंकी त्याठिकाणी संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने झडप घालून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याची झडती घेतली असता, त्याच्या कंबरेला एक धारदार शस्त्र सापडले, जे पोलिसांनी तात्काळ जप्त केले.
चौकशीत समोर आले की, रिंकेश सोलंकी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मारामारी, दंगा, सरकारी कामात अडथळा आणणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला शहरातून हद्दपार केलेले असतानाही त्याने कोणतीही परवानगी न घेता शहरात घुसखोरी केली होती. शहरात लागू असलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करणे आणि हद्दपारीच्या नियमाचा भंग करणे या गुन्ह्यांवरून त्याच्याविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धाडसी कारवाई पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि. जग्वेंद्रसिंग राजपुत यांच्या नेतृत्वात खंडणी विरोधी पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या पथकात श्रेपोउनि. दिलीप सगळे, श्रेपोउनि. दिलीप भोई, मसपोउनि. मंगला जगताप, आणि इतर पोलीस अंमलदारांचा समावेश होता. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.







