अॅमेझॉनच्या नावाने टास्क देऊन १६ लाखांना गंडवले; पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी रक्कम वाचली.
लाल 🚨 दिवा-नाशिक,१०:- प्रतिनिधी:ऑनलाइन टास्कच्या जाळ्यात अडकून लाखोंची फसवणूक झालेल्या निफाड येथील एका व्यापाऱ्याला नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी मोठा दिलासा दिला आहे. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या ‘गोल्डन अवर’ संकल्पनेमुळे सायबर चोरांनी लंपास केलेल्या १६.७८ लाखांपैकी तब्बल ९ लाख ८० हजार रुपये परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे सायबर गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
पिंपळगाव बसवंत येथील व्यापारी भावेश शांतीलाल धाडीवाल (वय ३५) यांना १० जुलै रोजी सायबर चोरांनी ‘Amazone 8’ नावाच्या एका टेलिग्राम ग्रुपमध्ये अॅड केले. आकर्षक उत्पादनांचे प्रमोशन केल्यास मोठा कॅशबॅक मिळेल, असे आमिष त्यांना दाखवण्यात आले. सुरुवातीला छोटा-मोठा परतावा देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर मोठ्या परताव्यासाठी मोठी गुंतवणूक करण्यास भाग पाडले गेले. या भूलथापांना बळी पडून धाडीवाल यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण १६,७८,००० रुपये हस्तांतरित केले. मात्र, पैसे परत मिळण्याऐवजी आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच श्री. धाडीवाल यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट नाशिक ग्रामीण सायबर पोलीस स्टेशन गाठले. येथे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागेश मोहीते, पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे, महिला पोलीस हवालदार सुवर्णा आहिरे आणि पोलीस अंमलदार आकाश आंबोरे यांच्या पथकाने तात्काळ सूत्रे हलवली.
‘गोल्डन अवर’ संकल्पनेनुसार, फसवणूक झाल्यानंतरचा सुरुवातीचा काही काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. या वेळेतच सूत्रे हलवल्यास रक्कम गोठवता येते. याच तत्त्वावर काम करत सायबर पोलिसांनी तात्काळ ऑनलाइन तक्रार नोंदवून ज्या खात्यांमध्ये पैसे गेले होते, त्या बँकांशी संपर्क साधला. पोलिसांच्या या वेगवान कारवाईमुळे फसवणुकीच्या रकमेपैकी तब्बल ९,८०,००० रुपये तात्काळ गोठवण्यात आले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाच्या आदेशाने ही रक्कम श्री. धाडीवाल यांना परत मिळवून देण्यात आली आहे.







