अर्धवट काम, धो-धो पाऊस आणि दाट धुक्यामुळे भीषण अपघाताची शक्यता; ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या जीवघेण्या निष्काळजीपणावर नागरिक संतप्त!
लाल 🚨 दिवा-वणी (नाशिक), दि.१०:-आमच्या प्रतिनिधीकडून:महाराष्ट्राचे अर्धे शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांचा जीव सध्या अक्षरशः टांगणीला लागला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार आणि ठेकेदाराच्या मनमानीमुळे गडावर जाणारा घाट रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर झाली असून, कोणत्याही क्षणी येथे मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
काय आहे नेमकी परिस्थिती?
सप्तशृंगी गडावरील घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, हे काम अत्यंत संथ गतीने आणि नियोजनशून्य पद्धतीने सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. रस्त्याच्या कामासाठी खोदलेले खड्डे आणि चर अर्धवट स्थितीत आहेत. कामासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी सळया धोकादायकरित्या रस्त्यावर बाहेर डोकावत आहेत. रात्रीच्या आणि पहाटेच्या वेळी दाट धुक्यामुळे वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. यामुळे अनेक वाहने या सळयांना धडकून त्यांच्या टायर फुटण्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. रस्त्याच्या कडेला कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक किंवा धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात आलेले नाहीत. यामुळे वळणाचा अंदाज न आल्याने एखादे वाहन थेट दरीत कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
प्रशासन झोपेत, भाविक दहशतीत!
या जीवघेण्या प्रवासाने भाविक आणि स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. “रात्रीच्या वेळी गडावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. प्रशासन एखादा मोठा अपघात होण्याची वाट बघत आहे का?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत. “आमच्या वाहनाचे नुकसान झाले तर चालेल, पण आमच्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर याला जबाबदार कोण? सार्वजनिक बांधकाम विभाग की ठेकेदार?” असा प्रश्न विचारला जात आहे.
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
जर या रस्त्यावर एखादा भीषण अपघात झाला आणि त्यात कुणाचा जीव गेला, तर संबंधित प्रशासन अधिकारी आणि ठेकेदारावर निष्काळजीपणाचा नाही, तर थेट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
जिल्हा पोरका, आता मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घालावे !
हे भीषण वास्तव जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनी एकदा स्वतः येऊन बघावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, दुर्दैवाने जिल्ह्याला पालकमंत्रीच नसल्याने “जिल्हाच पोरका झालाय, आमची व्यथा ऐकणार कोण?” अशा शब्दांत नागरिक आपला संताप व्यक्त करत आहेत. आता तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या गंभीर प्रश्नात लक्ष घालून सप्तशृंगीच्या भक्तांचे जीव वाचवावेत, अशी आर्त हाक सप्तशृंगीच्या दऱ्याखोऱ्यातून घुमत आहे.







