तिघे गेले, पुढचा नंबर कोणाचा? नाशिक पोलिसांच्या रडारवर अनेक सराईत.!, आता कोणाची खैर नाही? सण-उत्सवांच्या आधी पोलिसांचा ‘ऑपरेशन क्लीन-अप’ सुरू.

अंबड, इंदिरानगर, सातपूरमधील ‘भाईगिरी’ खल्लास; पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने उपायुक्त किशोर काळे यांची धडाकेबाज कारवाई; गुन्हेगारी जगतात भूकंप!

नाशिक: शहराची शांतता भंग करणाऱ्या आणि सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांचे आता काही खरे नाही! नाशिक शहर पोलिसांनी ‘ॲक्शन मोड’मध्ये येत अंबड, इंदिरानगर आणि सातपूर परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या तीन खतरनाक गुन्हेगारांना थेट शहरातून आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचा धडाकेबाज निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणानुसार, पोलीस उपायुक्त श्री. किशोर काळे यांनी हा दणका दिला असून, या कारवाईने गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

हे आहेत कायद्याच्या कचाट्यात सापडलेले ‘तीन तिघाडा’!

1.संदीप मारुती गायकवाड (वय-२५, रा. लेखानगर): अंबड परिसरात जीवघेणे हल्ले करणे, धारदार हत्याराचा धाक दाखवून खंडणी उकळणे आणि व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरवणे असे गंभीर गुन्हे याच्यावर दाखल आहेत. पोलिसांनी याला दोन वर्षांसाठी नाशिकमधून हद्दपार केले आहे.

2. इरफान उर्फ चिपड्या नुरमोहम्मद शेख (वय-३९, रा. वडाळागाव): इंदिरानगर परिसरात शस्त्र बाळगून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, अमली पदार्थांच्या विक्रीत मदत करणे, मारहाण आणि मालमत्तेचे नुकसान करणे असे तब्बल ५ गुन्हे याच्या नावावर आहेत. याला एका वर्षासाठी तडीपारीचा आदेश सुनावण्यात आला आहे.

3. प्रेम मिलिंद गिते (वय-२०, रा. श्रमिकनगर, सातपूर): कमी वयातच गुन्हेगारीत पाऊल टाकलेल्या या सराईताने सातपूरमध्ये लोखंडी कड्याने मारहाण, जबरी चोरी आणि दगडफेक करून दहशत निर्माण केली होती. यालाही दोन वर्षांसाठी शहराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

आता ‘मोक्का’ आणि ‘एमपीडीए’चा बडगा उगारणार !

आगामी सण-उत्सव आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर हद्दपारी, स्थानबद्धता (एमपीडीए) आणि प्रसंगी ‘मोक्का’सारखी कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आला आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांचीही आता गय केली जाणार नाही.

नागरिकांनो, तुम्हीच आमचे डोळे आणि कान!

पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी नागरिकांना निर्भयपणे पुढे येण्याचे आवाहन केले आहे. “तुम्हीच आमचे ‘साध्या वेशातील पोलीस’ आहात. हद्दपार केलेले हे गुन्हेगार शहरात किंवा जिल्ह्यात कुठेही दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या,” असे ते म्हणाले. माहिती देणाऱ्याचे नाव आणि ओळख १००% गुप्त ठेवली जाईल,असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. या धडक कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, नाशिक पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!