!! राजकीय वादळ !! , नांदूर नाका हल्ला प्रकरण पेटले! भाजपच्या माजी नगरसेवकावर थेट हल्ल्याचा आरोप; शिवसेनेचा अटक न केल्यास आंदोलनाचा इशारा!

हल्लेखोर माजी नगरसेवक उद्धव निमसे सीसीटीव्हीत कैद झाल्याचा दावा; पीडित कुटुंबावर दबावाचाही गंभीर आरोप, नाशिकचे राजकारण तापले!

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.२५ :- प्रतिनिधीकडून:नांदूर नाका परिसरात काही दिवसांपूर्वी दोन युवकांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणाने आता रौद्र राजकीय वळण घेतले आहे. या हल्ल्यात भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक उद्धव निमसे हे स्वतः सहभागी होते, असा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. या संदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने थेट पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर केले असून, निमसे यांना तात्काळ अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा गर्भित इशारा दिला आहे. या प्रकरणामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.

काय आहे शिवसेनेचा आरोप?

शिवसेनेने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. २२ ऑगस्ट रोजी आडगाव पोलीस स्टेशन हद्दीत दोन युवकांवर जो प्राणघातक हल्ला झाला, तो साधा वाद नव्हता. या हल्ल्याचे नेतृत्व थेट भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी केले होते. निमसे यांनीच गुंडांना सोबत घेऊन त्या युवकांवर हल्ला चढवला, असा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून, फिर्यादीत स्पष्ट नाव असूनही राजकीय दबावामुळे पोलीस निमसे यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

पीडित कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी

या हल्ल्यानंतर फिर्यादीच्या कुटुंबावर राजकीय आणि गुंडांकडून प्रचंड दबाव आणला जात असून, त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे या कुटुंबाच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी आग्रही मागणी शिवसेनेने केली आहे. एका माजी लोकप्रतिनिधीनेच अशा प्रकारे कायदा हातात घेणे हे लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक असून, भाजपच्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याच्या वृत्तीचे हे आणखी एक उदाहरण असल्याची टीकाही शिवसेनेने केली आहे.

शिवसेनेच्या प्रमुख मागण्या:

 माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तात्काळ अटक करावी.

 हल्ल्यात सहभागी असलेल्या त्यांच्या सर्व साथीदारांना बेड्या ठोकाव्यात.

 पीडित आणि त्यांच्या कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण पुरवावे.

 कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी निःपक्षपातीपणे तपास करावा.

या मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने रस्त्यावर उतरेल, असा थेट इशाराच या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनावरील दबाव वाढला असून, आता पोलीस आयुक्त यावर काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नांदूर नाका परिसरात या घटनेमुळे तणावपूर्ण शांतता पसरली आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!