ऐतिहासिक कारवाई! छत्रपती संभाजीनगर शहर १००% भोंगेमुक्त!

पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या नेतृत्वात धडक मोहीम; १९०६ धार्मिक स्थळांवरील तब्बल ६५९१ बेकायदेशीर भोंगे उतरवले, शहरवासीयांना मोठा दिलासा

लाल 🚨 दिवा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर:शहरातील शांतता आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाने एक ऐतिहासिक आणि धाडसी कारवाई केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वादाचा आणि ध्वनी प्रदूषणाचा गंभीर विषय ठरलेले धार्मिक स्थळांवरील बेकायदेशीर भोंगे (ध्वनिक्षेपक) १०० टक्के हटवण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या कुशल नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली राबवलेल्या या मोहिमेमुळे शहरातील तब्बल१९०६ धार्मिक स्थळांवरील एकूण ६५९१ भोंगे शांततेच्या मार्गाने उतरवण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

दोन महिन्यांचे अथक प्रयत्न आणि सामोपचाराचे धोरण

गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस आयुक्तालयाने या संवेदनशील विषयावर अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू केले होते. शहरातील सर्व धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांसोबत पोलीस स्टेशन, एसीपी, डीसीपी आणि थेट पोलीस आयुक्त कार्यालयात बैठकांचे सत्र आयोजित करण्यात आले. या बैठकांमध्ये थेट संवाद साधून आणि कायद्याची माहिती देऊन सामोपचाराने भोंगे काढण्यासाठी आवाहन करण्यात आले. काही धार्मिक स्थळांवर तर ५ ते ६ भोंगे लावण्यात आल्याचे निदर्शनास आले होते, जे आवाजाच्या मर्यादेचे सर्रास उल्लंघन करत होते.

सामाजिक सलोखा जपत यशस्वी मोहीम

छत्रपती संभाजीनगर हे एक संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे ही कारवाई करताना सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, पोलीस प्रशासनाने दाखवलेली परिपक्वता आणि सर्वधर्मीय स्थळांच्या प्रमुखांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता ही मोहीम यशस्वीरित्या आणि शांततेत पार पडली.

कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात

बेकायदेशीर भोंगे उतरवल्यानंतर आता कायदेशीर मार्गाने ध्वनिक्षेपक लावण्यासाठी परवानगी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नियमांचे पालन करून अर्ज करणाऱ्या धार्मिक स्थळांच्या अर्जांवर पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ध्वनी प्रदूषणाला मोठा आळा: पोलीस आयुक्त

 या कारवाईबाबत बोलताना पोलीस आयुक्त प्रवीण पवार म्हणाले, “आजपर्यंत शहरातील नागरिकांना धार्मिक स्थळांवरील बेकायदेशीर ध्वनीक्षेपकांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना याचा सर्वाधिक फटका बसत होता. आता शहरातील सर्व धार्मिक स्थळांवरील बेकायदेशीर ध्वनीक्षेपक काढण्यात आल्यामुळे ध्वनी प्रदूषणाला मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. याकामी सहकार्य केलेल्या सर्व धार्मिक स्थळांच्या प्रमुखांचे आणि नागरिकांचे आम्ही आभारी आहोत.

 

प्रवीण पवार, पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर.

या अभूतपूर्व कारवाईमुळे छत्रपती संभाजीनगर शहराने ध्वनी प्रदूषण नियंत्रणाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले असून, पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!