!! लाल दिवा न्यूज इम्पॅक्ट !! ,आरोग्य घोटाळ्यावर सर्वात मोठा वार: ‘लाल दिवा’च्या बातमीने प्रशासन हादरले; सिन्नरच्या ‘त्या’ वादग्रस्त हॉस्पिटलची महात्मा फुले योजना कायमची रद्द!

न्यायासाठीचा लढा यशस्वी: ‘लाल दिवा’ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना मोठे यश!

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.१ : ‘लाल दिवा न्यूज’ने पुराव्यानिशी उघडकीस आणलेल्या आरोग्य योजनेतील महाघोटाळ्याने अखेर प्रशासनाला जाग आणली आहे. गोरगरिबांच्या योजनेत बनावट रुग्ण दाखवून शासनाची आणि रुग्णांची कोट्यवधी रुपयांची लूट करणाऱ्या सिन्नरच्या डॉ. अंजली विष्णू हॉस्पिटलच्या भ्रष्ट कारभाराचा पहिला बळी गेला आहे. आमच्या बातमीनंतर आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या लढ्यानंतर, जिल्हा प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर शासनाने अखेर या हॉस्पिटलची महात्मा फुले जन आरोग्य योजना कायमस्वरूपी रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा ‘लाल दिवा न्यूज’च्या बातमीचा आणि सत्य- न्यायासाठी लढणाऱ्यांचा पहिला मोठा विजय आहे.

!! ‘लाल दिवा न्यूज’च्या बातमीनंतर शासनाचा पहिला दणका !!

‘लाल दिवा न्यूज’वर या महाघोटाळ्याचा पर्दाफाश होताच महाराष्ट्रभरात खळबळ उडाली होती. मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर, नाशिकचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी तातडीने एक चौकशी समिती गठीत केली होती. या समितीने तक्रारदार योगेश पाटील यांनी दिलेले सर्व पुरावे, ‘लाल दिवा न्यूज’ने सादर केलेले तपशील आणि आरोपांची सखोल चौकशी केली.

या चौकशीचा अहवाल शासनाकडे सादर होताच, आरोग्य विभागाने एक क्षणही न दवडता मोठा निर्णय घेतला. ‘व्हायोलेशन ऑफ टर्म्स अँड कंडिशन्स’ (Violation of Terms and Conditions) म्हणजेच योजनेच्या अटी व शर्तींचा भंग केल्याचा ठपका ठेवत, डॉ. अंजली विष्णू हॉस्पिटलची महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील नोंदणी तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आली आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे भ्रष्टाचाराच्या या साखळीला पहिला आणि जबरदस्त हादरा बसला असून, आता यापुढे सदर हॉस्पिटलला या योजनेअंतर्गत एकाही रुग्णावर उपचार करता येणार नाहीत.

एका बातमीने हादरली भ्रष्टाचाराची साखळी: असा होता संपूर्ण थरार

दुहेरी लूट: सिन्नरच्या श्रीमती सखुबाई शिंदे यांच्याकडून योजनेत पात्र असूनही ₹२५,०००/- उकळले आणि त्याचवेळी बनावट आजार दाखवून शासनाकडूनही पैसे लाटण्याचा प्रयत्न केला.

दलालांची मध्यस्थी: प्रकरण उघडकीस आणणारे सामाजिक कार्यकर्ते योगेश नानासाहेब पाटील यांना एमडी इंडिया TPA कंपनीचे व्यवस्थापक विजय अहिरे यांनी “पैसे घ्या, विषय मिटवा,” अशी थेट ऑफर देत, त्यांच्या खात्यावर ₹२५,०००/- पाठवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.

अमानुषता आणि धमकी: तक्रार मागे घेण्यासाठी रुग्णाला “टाके काढून देणार नाही,” अशी धमकी देऊन हॉस्पिटलमधून हाकलून दिले.

पत्रकारावर दबाव: ‘लाल दिवा न्यूज’ने बातमी प्रसिद्ध करताच पत्रकार मनोहर नगराज पाटील यांना “बच्चू कडू आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांना सांगून घर फोडू” आणि “ऍट्रॉसिटी, खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करू,” अशी थेट धमकी हॉस्पिटल संचालकांनी दिली.

योजना रद्द, पण गुन्हेगारांचे काय? लढाई अजून बाकी!

शासनाने हॉस्पिटलची योजना रद्द करून आमच्या बातमीची आणि तक्रारदारांच्या लढ्याची दखल घेतली असली, तरी या प्रकरणातील गुन्हेगारांवर फौजदारी कारवाईची तलवार अजूनही लटकत आहे. यावर तक्रारदार योगेश पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

 “‘लाल दिवा न्यूज’ने हे प्रकरण लावून धरल्याने आणि आमच्या तक्रारीमुळे शासनाने हॉस्पिटलला योजनेतून वगळून पहिला दणका दिला, याचे आम्ही स्वागत करतो. पण ही केवळ प्रशासकीय कारवाई आहे. आमचा लढा केवळ योजना रद्द करण्यापुरता नव्हता, तर यातील गुन्हेगारांना तुरुंगात पाठवण्यासाठी आहे. ज्यांनी रुग्णांना लुटले, शासनाला फसवलं, खंडणीची ऑफर दिली आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, त्या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होईपर्यंत आमचा लढा थांबणार नाही.”

या मागण्यांवर सरकार गप्प का?

1. एमडी इंडियाचे अधिकारी विजय अहिरे यांच्यावर खंडणी आणि कटाचा FIR दाखल करून अटक करावी.

2. हॉस्पिटल संचालकांवर फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा.

3. एमडी इंडिया TPA कंपनीच्या संपूर्ण कारभाराची

फॉरेन्सिक ऑडिट चौकशी व्हावी.

4. राजकीय नेत्यांची नावे वापरून धमक्या देणाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी.

हॉस्पिटलची योजना रद्द होणे ही केवळ सुरुवात आहे. ‘लाल दिवा न्यूज’ या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन यातील प्रत्येक गुन्हेगाराला कायद्याच्या चौकटीत उभे करण्यासाठी पाठपुरावा करत राहील.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!