कर्तव्यनिष्ठेचा सन्मान! मुसळधार पावसातही बंदोबस्त चोख; पोलीस अधीक्षकांचा भव्य सत्कार

अहिल्यानगर पोलिसांच्या कामगिरीचे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेकडून कौतुक

लाल 🚨 दिवा-अहिल्यानगर, दि. :-१ (वार्ताहर): शहरात नुकत्याच पार पडलेल्या मोहरम सणानिमित्त सलग सहा दिवस मुसळधार पावसाची पर्वा न करता, दिवस-रात्र अहोरात्र कष्ट करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणाऱ्या पोलीस दलाच्या कामगिरीचा भव्य सत्कार करण्यात आला. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण पोलीस टीमने दाखवलेल्या अतुलनीय कर्तव्यनिष्ठेबद्दल महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.

मोहरम सणाच्या काळात शहरात पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही पोलीस बंधू आणि भगिनींनी आपल्या कर्तव्यात कोणतीही कसूर ठेवली नाही. भर पावसात चिंब भिजून, सवारी मार्गावर ठामपणे उभे राहून त्यांनी अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला. त्यांच्या या अथक परिश्रमांमुळेच मोहरमची विसर्जन मिरवणूक अत्यंत शांततेत आणि उत्साहात पार पडली व कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

पोलिसांच्या याच निस्वार्थ सेवेची दखल घेत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. राहुल दुबाले, अहिल्यानगर महिला जिल्हाध्यक्ष आशा पालवे, जिल्हाध्यक्ष आरिफ शेख, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ लंके, कविता मॅडम, बाबा शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अत्यंत उत्साही वातावरणात पार पडलेल्या या सत्कार सोहळ्यामुळे पोलीस दलाचे मनोबल निश्चितच उंचावले आहे.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष आरिफ शेख म्हणाले, “भर पावसात स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता शहराच्या शांततेसाठी झटणाऱ्या या खाकी वर्दीतील देवदूतांचा आम्हाला अभिमान आहे. अधीक्षक घारगे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बजावलेली कामगिरी कौतुकास्पद आहे.” या सत्कारामुळे पोलीस आणि जनता यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक घट्ट झाले आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!