वडनेरवर शोककळा! १८ तासांच्या थरारानंतर अखेर ती दुर्दैवी बातमी आलीच; नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षीय ऋतिकचा मृत्यू!

वडिलांच्या डोळ्यादेखत उचलून नेले, व्हायरल व्हिडिओने महाराष्ट्र हादरला; वनविभागाच्या कार्यक्षमतेवर संतप्त नागरिकांचा प्रहार.

लाल 🚨 दिवा-नाशिक,२४:-संपूर्ण शहराचे आणि राज्याचे लक्ष लागून असलेल्या वडनेर येथील थरारनाट्याचा अखेर दुर्दैवी अंत झाला आहे. मंगळवारी रात्री बिबट्याने उचलून नेलेल्या दोन वर्षीय ऋतिक गंगाधर याचा मृतदेह तब्बल १८ तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर बुधवारी दुपारी घनदाट जंगलात सापडला. या घटनेने परिसरात शोककळेचे वातावरण पसरले असून, नागरिकांमध्ये वनविभागाविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

मंगळवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास वडनेर गेट येथील कारगिल गेट आर्मी परिसरात राहणारा दोन वर्षीय ऋतिक घराच्या अंगणात खेळत होता. त्याचे वडील गंगाधर हे जवळच होते. अचानक, काळ बनून आलेल्या एका चपळ बिबट्याने क्षणात ऋतिकवर झडप घातली आणि त्याला जबड्यात धरून पळ काढला. आपल्या डोळ्यादेखत पोटच्या गोळ्याला मृत्यूच्या दाढेत जाताना पाहून वडिलांनी जीवाच्या आकांताने आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग केला. मात्र, बिबट्याने घरासमोरील उंच भिंतीवरून उडी मारत जवळच्याच जंगलात धूम ठोकली. या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संपूर्ण महाराष्ट्र हादरला.

१८ तासांची थरारक शोधमोहीम

घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक केशव पोरजे, जगदीश पवार यांच्यासह शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी धावले. त्यांनी तात्काळ वनविभाग आणि उपनगर पोलीस ठाण्याला माहिती दिली. रात्रीच्या अंधारातच वनविभागाचे कर्मचारी, पोलीस पथक, जवान आणि ग्रामस्थांनी शोधकार्य सुरू केले. ड्रोन कॅमेरे आणि श्वानपथकाच्या मदतीने संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला, मात्र रात्रभर ऋतिकचा कोणताही सुगावा लागला नाही.

अखेर दुर्दैवी शेवट

बुधवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली. अखेर दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान, घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या घनदाट जंगलात वनविभागाच्या रेस्क्यू टीमला आणि जवानांना ऋतिकचा निष्प्राण देह आढळून आला. आपल्या चिमुकल्याचा मृतदेह पाहून त्याच्या कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता.

दोन महिन्यांपूर्वी याच परिसरात आयुष भगत या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला होता. त्यावेळी दिलेल्या आश्वासनानंतरही वनविभागाने नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त न केल्याने आज ऋतिकचा जीव गेला, असा आरोप करत संतप्त नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. “आखिर अजून किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल विचारला जात असून, या नरभक्षक बिबट्याला तात्काळ ठार मारण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!