वडनेरमध्ये पुन्हा काळरात्र! खेळणाऱ्या चिमुकल्याला बिबट्याने केले लक्ष्य; नागरिकांमध्ये संतापाची लाट.

दोन महिन्यांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती, वनविभागाच्या कार्यक्षमतेवर संतप्त सवाल; शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू.

लाल 🚨 दिवा -नाशिट,दि.२४:-वडनेर एकीकडे दिवाळीच्या सणाची धामधूम सुरू असताना वडनेर गेट परिसरातून काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना समोर आली आहे. अवघ्या दोन वर्षांच्या श्रुतिक नावाच्या चिमुकल्याला त्याच्या घराच्या जवळूनच नरभक्षक बिबट्याने हल्ला करून उचलून नेले. या घटनेने संपूर्ण वडनेर परिसरात भीतीची आणि दहशतीची गडद छाया पसरली असून, नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडनेर गेट परिसरातील कारगिल गेट जवळ असलेल्या क्वार्टरमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील दोन वर्षीय श्रुतिक सायंकाळच्या वेळी घराबाहेर खेळत होता. अचानक, जवळच्याच झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने क्षणार्धात त्याच्यावर झडप घातली आणि त्याला तोंडात धरून जंगलाच्या दिशेने ओढत नेले. काही कळायच्या आतच घडलेल्या या प्रकाराने मुलाच्या आईने हंबरडा फोडला, पण तोपर्यंत बिबट्या अंधारात दिसेनासा झाला होता.

दोन महिन्यांपूर्वीची जखम पुन्हा ताजी

विशेष म्हणजे, अवघ्या दीड ते दोन महिन्यांपूर्वीच वडनेर दुमाला येथे आयुष भगत या तीन वर्षांच्या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यावेळी वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्याचे आश्वासन दिले होते. या मागणीसाठी माजी नगरसेवक केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून जाब विचारला होता. मात्र, वनविभागाच्या सुस्त कारभारामुळे आज पुन्हा एकदा एका निष्पाप बालकाचा जीव धोक्यात आला आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. “आखिर किती बळी गेल्यानंतर वनविभाग जागा होणार?” असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे

घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक केशव पोरजे, जगदीश पवार यांच्यासह शेकडो ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. हातात टॉर्च, काठ्या घेऊन त्यांनी मुलाचा शोध सुरू केला आहे. वनविभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असले तरी, दाट अंधार आणि बिबट्याच्या दहशतीमुळे शोधकार्यात मोठे अडथळे येत आहेत.

रात्रीच्या अंधारात श्रुतिकचा शोध सुरू असून, त्याच्या कुटुंबीयांच्या आक्रोशाने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. या घटनेमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नरभक्षक बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी जोर धरू लागली आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!