लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.१३:-(प्रतिनिधीकडून):अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या साम्राज्यवादी धोरणांविरोधात आणि भारतावर लादलेल्या ‘कर युद्धा’विरोधात आज खुटवडनगर येथे तीव्र संतापाचा भडका उडाला. भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि सीआयटीयु (CITU) च्या वतीने सीटू कामगार भवनासमोर ट्रम्प यांच्या प्रतिमेचे दहन करत जोरदार निदर्शने करण्यात आली. ‘अमेरिकन साम्राज्यवाद मुर्दाबाद’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
अमेरिकेचा कुरूप चेहरा उघड
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी १ ऑगस्टपासून भारतीय वस्तूंवर २५ टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कर लादून भारताच्या अर्थव्यवस्थेवर हल्ला चढवला आहे. यामुळे देशातील उद्योग आणि शेती क्षेत्राचे कंबरडे मोडणार आहे. इतकेच नाही, तर भारताने रशियाकडून तेल आणि शस्त्रे खरेदी केल्यास २७ ऑगस्टपासून हे शुल्क तब्बल ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची धमकीही ट्रम्प प्रशासनाने दिली आहे. हा अमेरिकेच्या साम्राज्यवादी आणि कुरूप चेहऱ्याचा पर्दाफाश आहे, असा घणाघाती आरोप आंदोलकांनी यावेळी केला.
सार्वभौमत्वालाच थेट आव्हान
“भारताच्या सार्वभौमत्वालाच हे थेट आव्हान असून, स्वतंत्र परराष्ट्र धोरण ठरवण्याच्या भारताच्या अधिकारावर अमेरिका अतिक्रमण करत आहे. मोदी सरकारने अमेरिकेच्या या दबावासमोर गुडघे टेकू नये,” असे आवाहन कॉ. सीताराम ठोंबरे यांनी केले. आंदोलकांनी स्पष्ट केले की, या करारामुळे केवळ कामगार आणि शेतकऱ्यांचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे नुकसान होऊन त्याचा फायदा युरोपियन युनियनसारख्या साम्राज्यवादी देशांनाच होईल.
सरकारला खडा सवाल
“अमेरिकेसोबत सुरू असलेल्या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी ताबडतोब थांबवाव्यात. सतत धमक्या देणाऱ्या अमेरिकेसमोर मोदी सरकारने मान तुकवू नये. शेतकरी आणि कामगारविरोधी कोणताही करार आम्ही सहन करणार नाही,” असा सज्जड दम ॲड. तानाजी जायभावे यांनी दिला.
या आंदोलनात सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीमधील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कॉ. देविदास आडोळे, कॉ. संतोष काकडे, कल्पनाताई शिंदे, छाया जाधव यांच्यासह कॉ. मोहन जाधव, दत्ता राक्षे, गौतम कोंगळे, युवराज पाटील, विजया टिक्कल आणि अनेक प्रमुख पदाधिकारी व संतप्त कामगार उपस्थित होते. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.







