त्रिमुर्ती चौकात दिवसाढवळ्या थरार! सुरक्षेची बतावणी करत तोतया पोलिसांनीच आजोबांना घातला गंडा!

‘साहेब बोलवत आहेत’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला अडवले; सुरक्षिततेची बतावणी करून दागिने लंपास, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने खळबळ

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. ०२ (आमच्या प्रतिनिधीकडून):शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच, पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटणाऱ्या टोळीने पुन्हा डोके वर काढले आहे. अंबड परिसरातील त्रिमुर्ती चौकात दिवसाढवळ्या एका ७४ वर्षीय सेवानिवृत्त नागरिकाला ‘तुमचे दागिने चोरीला जातील’ अशी भीती घालून त्यांच्याजवळील तब्बल ७६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

याप्रकरणी आनंदराव कृष्णा चौधरी (वय ७४, रा. उंटवाडी) यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंदराव चौधरी हे मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्रिमुर्ती चौकातून जात होते. यावेळी २५ ते ३५ वयोगटातील तीन अनोळखी इसमांनी त्यांना गाठले. त्यातील एकाने ‘साहेब बोलवत आहेत,’ असे सांगून चौधरी यांना दर्शन गिफ्ट हाऊसजवळ उभ्या असलेल्या मोटारसायकलजवळ नेले.

तेथे उभ्या असलेल्या दुसऱ्या इसमाने आपण क्राईम ब्रँचचे ‘साहेब’ असल्याची बतावणी केली. विश्वास संपादन करण्यासाठी, त्यांच्या तिसऱ्या साथीदाराकडून कागदात गुंडाळलेली एक वस्तू घेऊन स्वतःच्या बॅगेत ठेवली आणि त्याला ‘जा’ म्हणून सांगितले. हा सर्व प्रकार चौधरी यांच्या समोरच घडवून आणण्यात आला.

त्यानंतर त्या तोतया ‘साहेबाने’ चौधरी यांना अत्यंत आपुलकीने सांगितले, ‘बाबा, सध्या गणेशोत्सव सुरू आहे. चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. तुमचे सोन्याचे दागिने चोरीला जाऊ नयेत म्हणून ते काढून ठेवा. बघा, आत्ताच तुमच्या समोर त्या दादानेही त्याचे दागिने काढून सुरक्षित ठेवले.’

या भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून चौधरी यांनी आपल्या गळ्यातील ५२ हजार रुपये किमतीची १३ ग्रॅमची सोन्याची चैन आणि हातातील २४ हजार रुपये किमतीची ६ ग्रॅमची अंगठी काढून दिली. क्षणाचाही विलंब न लावता, या तिघांनी दागिने ताब्यात घेतले आणि काही कळायच्या आतच तेथून पसार झाले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आनंदराव चौधरी यांनी तात्काळ अंबड पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरोधात **भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), २०४, ३ (५)** अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, मसपोनि पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घुणावत यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून आरोपींचा शोध घेत आहेत.

सणासुदीच्या काळात अशा फसव्या टोळ्या सक्रिय होतात. कोणीही पोलीस असल्याची बतावणी करून दागिने काढायला सांगितल्यास त्याला बळी पडू नका. संशय आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. रस्त्यात भेटलेल्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून आपले मौल्यवान दागिने किंवा वस्तू त्यांच्या हातात देऊ नयेत, असे आवाहन नाशिक शहर पोलिसांनी केले आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!