मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; दोन दिवसीय महसूल परिषदेचा नागपुरात समारोप
लाल 🚨 दिवा-नागपूर, दि. ३ :राज्याच्या आर्थिक विकासाचा कणा असलेल्या महसूल विभागाला तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख बनवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. भारतीय प्रबंध संस्थान (आयआयएम) येथे आयोजित दोन दिवसीय महसूल परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, जमाबंदी आयुक्त, नोंदणी महानिरीक्षक यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शिफारशी धोरणात्मक निर्णयांसाठी दिशादर्शक
मुख्यमंत्री म्हणाले, “महसूल विभाग जनतेला सर्वाधिक ऑनलाइन सेवा देणारा विभाग म्हणून ओळखला जातो. लोकाभिमुख कारभार अधिक प्रभावी करण्यासाठी या परिषदेत विविध अभ्यास गटांनी सादर केलेल्या शिफारशी भविष्यातील धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी दिशादर्शक ठरतील. काळाची गरज ओळखून महसूल विषयक कार्यप्रणालीत बदल करणे आवश्यक आहे.”
अहवाल अचूक व निर्दोष असावा
परिषदेत विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समित्यांनी विविध विषयांवर सादरीकरण केले. महसुली कामकाजात सुसूत्रता व गतिमानता आणण्यासाठीच्या उपाययोजना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणल्या. अधिकाधिक सेवा ऑनलाइन करून पारदर्शकता वाढवण्यावर या वेळी भर देण्यात आला. शासनाला सादर करण्यात येणारा अंतिम अहवाल अचूक व निर्दोष असावा यासाठी प्रत्येक बाबीचा सखोल अभ्यास करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
अधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
या परिषदेमुळे नाविन्यपूर्ण कल्पना आणि उपाययोजनांचे आदानप्रदान झाले असून प्रशासनात नवी कार्यपद्धती अस्तित्वात येईल, अशी आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. हे विचारमंथन केवळ जिल्हा स्तरावरच नव्हे, तर तालुका पातळीपर्यंतच्या कामकाजासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. ही परिषद विभागाच्या भविष्यातील वाटचालीसाठी मैलाचा दगड ठरणार असल्याची भावनाही उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.







