नगरसेवक पुत्राच्या ‘खंडणी गँग’वर आता ‘मोक्का’चा फास? बारमधील गोळीबार थरारानंतर ३ आरोपींना बेड्या, भूषण लोंढे फरार पोलिसांची गुन्हेगारीवर सर्जिकल स्ट्राईक!

उपायुक्त किशोर काळे यांची माहिती; २४ तासांच्या आत पोलिसांची धडक कारवाई, फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना. संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडणार!

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. ०५: राजकीय आश्रयाखाली शहरात दहशत माजवणाऱ्या नगरसेवक पुत्र भूषण लोंढे याच्या ‘खंडणी गँग’वर नाशिक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सातपूर येथील हॉटेल औरा बारमधील थरारनाट्यानंतर २४ तासांच्या आत पोलिसांनी ३ आरोपींना बेड्या ठोकल्या असून, या टोळीवर आता ‘मोक्का’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाईचा फास आवळण्याची तयारी सुरू झालीआहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या गुन्हेगारी विरोधी मोहिमेला हे मोठे यश मानले जात आहे.

पोलिस ‘ॲक्शन मोड’मध्ये; उपायुक्तांनी दिली माहिती

या खळबळजनक प्रकरणाची माहिती देताना परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी सांगितले की, “शहराची शांतता भंग करणाऱ्या कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीला खपवून घेतले जाणार नाही. हॉटेल औरा बारमधील घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवली. यातील तीन प्रमुख आरोपींना अटक करण्यात यश आले असून, उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके शहराबाहेरही रवाना करण्यात आली आहेत.

सातपूरच्या आयटीआय सिग्नलजवळ असलेल्या हॉटेल औरा बारमध्ये काल मध्यरात्री तरुणांमधील वादात दहशत माजवण्याच्या उद्देशाने भूषण लोंढे याच्या टोळीने चाकू हल्ला आणि गोळीबार करून एका तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तपासात असे उघड झाले की, बारमध्ये होणारे वाद मिटवण्याच्या नावाखाली या टोळीने बार मालकाकडून १० टक्के खंडणी स्वरूपात भागीदारी मिळवली होती. ही केवळ वादाची घटना नसून, एक संघटित खंडणी रॅकेट असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

मोक्का’ लावण्याच्या हालचालींना वेग!

उपायुक्त किशोर काळे यांनी पुढे संकेत दिले की, या टोळीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि संघटित स्वरूप पाहता, त्यांच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. एकदा मोक्का लागल्यास आरोपींना सहजासहजी जामीन मिळणार नाही आणि संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्यास मोठी मदत होईल.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलिसांचे पथक या गुन्ह्याचा सखोल तपास करत आहे. राजकीय दबाव झुगारून, निःपक्षपातीपणे आणि वेगाने केलेल्या या कारवाईमुळे नाशिक शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. या धडक कारवाईने गुन्हेगारी विश्वात प्रचंड दहशत पसरली असून, नाशिककरांनी पोलिसांच्या कामगिरीचे तोंडभरून कौतुक केले आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!