थरार… पाठलाग… आणि अखेर मुसक्या आवळल्या! टिप्पर गँगचा म्होरक्या ‘मोठा पठाण’ चाळीसगावमधून जेरबंद; गुंडा विरोधी पथकाची धाडसी कामगिरी!

पोलिसांचा ‘ऑपरेशन पठाण’ यशस्वी! कोटींच्या खंडणीचा मास्टरमाइंड चाळीसगावमधून अटकेत; नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

लाल 🚨 दिवा नाशिक,दि.२७ :- शहरात खंडणीसाठी अपहरण करून व्यावसायिकावर गोळीबार करणाऱ्या क्रूर टिप्पर गँगचा म्होरक्या शाकीर पठाण उर्फ ‘मोठा पठाण’ याच्या पोलिसांनी थरारक पाठलाग करून मुसक्या आवळल्या आहेत. अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या कुख्यात गुंडाला गुंडा विरोधी पथकाने चाळीसगाव येथे मध्यरात्री सापळा रचून अटक केली. त्याच्या अटकेमुळे नाशिकच्या गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  • काय होते प्रकरण?

दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी नाशिकचे व्यावसायिक श्री. निखील दर्यानाणी यांच्या गाडीत काठे गल्ली सिग्नलवर दोन अनोळखी इसम बळजबरीने घुसले. त्यांनी श्री. दर्यानाणी यांना बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आणि तब्बल १ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. यानंतर आरोपींनी त्यांना घोटी-कळसुबाईच्या निर्जनस्थळी नेऊन जीवे मारण्याच्या उद्देशाने हवेत आणि जमिनीवर गोळीबार करत दहशत निर्माण केली. अखेर, श्री. दर्यानाणी यांच्या भावाने आरोपींच्या साथीदाराला १५ लाख रुपये दिल्यानंतर त्यांची सुटका झाली. या गंभीर गुन्ह्याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य आणि आरोपींची सराईत गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता, या प्रकरणात ‘मोक्का’ कायद्यान्वये कलमांची वाढ करण्यात आली होती.

पोलिसांचा ‘ऑपरेशन पठाण’

शहरात दहशत माजवणाऱ्या या गुंडाला तात्काळ अटक करण्याचे आदेश पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णीक यांनी गुंडा विरोधी पथकाला दिले होते. मात्र, ‘मोठा पठाण’ अत्यंत धूर्त असून तो सतत आपले ठिकाण बदलत होता. गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि. ज्ञानेश्वर मोहिते यांना माहिती मिळाली की, पठाण १५ दिवसांपूर्वी लोणावळ्यामधून कोकण किनारपट्टीवर गेला होता.

या माहितीच्या आधारे पथकाने लोणावळा आणि कोकण किनारपट्टी पिंजून काढली. तेव्हा तो टोयोटा ग्लांझा गाडी वापरत असून संभाजीनगरमध्ये लपल्याची नवी माहिती मिळाली. पथकाने तात्काळ संभाजीनगर गाठले, पण तोपर्यंत तो तिथूनही निसटला होता. तो चाळीसगाव, मालेगाव आणि संभाजीनगर येथे सतत फिरत असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाल्यानंतर गुंडा विरोधी पथकाने चिकाटी सोडली नाही.

  • अखेर सापळा यशस्वी झाला!

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाने मालेगाव, चाळीसगाव व संभाजीनगर अशा तिन्ही ठिकाणी एकाच वेळी सापळा रचला. दिनांक २७ जुलै रोजी मध्यरात्रीच्या अंधारात, चाळीसगाव येथील पिर मुसाकादरीबाबा दर्ग्याजवळ ‘मोठा पठाण’ असल्याची पक्की खबर मिळाली. क्षणाचाही विलंब न लावता, पथकाने अत्यंत शिताफीने आणि धाडसाने त्याला त्याच्या ग्लांझा कारसह (MH 11 DD 2101) घेरले. त्याला प्रतिकार करण्याची कोणतीही संधी न देता जेरबंद केले आणि नाशिकला आणून मुंबईनाका पोलिसांच्या ताब्यात दिले.

या अटकेमुळे नाशिक शहरातील संघटित गुन्हेगारीला मोठा हादरा बसला आहे. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णीक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, सुनिल आडके, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, आणि राजेश राठोड यांनी ही धाडसी कामगिरी यशस्वीपणे पार पाडली.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!