शिक्षण क्षेत्रातील भूकंपाचे धक्के आता विवेकानंद सोसायटीपर्यंत!

आदर्श’ संस्थेत अनादर्शाचा कळस! ‘पवित्र’ त्रिमूर्तींनी ‘चाणक्य’ अधिकाऱ्यांना चारला लाचेचा चारा?*

 ‘सोनिया’ लिपिकाच्या समायोजनासाठी लाखो रुपयांचा ‘प्रसाद’! शिक्षणनगरीत ‘ज्ञानसागर’च्या नावाने भ्रष्टाचाराचा महासागर!

,शिक्षणनगरी, (विशेष प्रतिनिधी) :शहराच्या शिक्षण विश्वाला मुळापासून हादरवणाऱ्या भरती घोटाळ्याचे लोण आता प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या *‘ज्ञानसागर’ शिक्षण संस्थे* पर्यंत पोहोचले आहे. संस्थेच्या पांढरपेशा बुरख्याआड चालणाऱ्या ‘अर्थ’पूर्ण व्यवहारांचे पितळ उघडे पडण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी *‘चाणक्य’ कुमार* यांच्यासह त्यांचे दोन साथीदार *‘नवरत्न’ आणि ‘सुवर्णकर’* तुरुंगाची हवा खात असताना, आता ‘ज्ञानसागर’ संस्थेच्या ‘पवित्र’ त्रिमूर्तींच्या गळ्याभोवती चौकशीचा फास आवळला जात आहे.

काय आहे ‘आदर्श’ संस्थेचा ‘प्रेरणादायी’ प्रताप?

मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार, ‘ज्ञानसागर’ संस्थेच्या माध्यमिक विभागात एक ‘सोनिया’ लिपिक अतिरिक्त ठरत होता. नियमांच्या चौकटीत या लिपिकाला प्राथमिक विभागात घेणे अशक्य होते. मात्र, याच अशक्य कामाला ‘शक्य’ करण्यासाठी संस्थेच्या अध्यक्ष ‘पावनी’ देवी, उपाध्यक्षा ‘स्फूर्ती’ शर्मा आणि सचिव असलेले माजी प्रशासकीय ‘सिंघम’ प्रतापराव या त्रिकुटाने आपली सर्व ‘पॉवर’ पणाला लावली.

या ‘त्रिमूर्तींनी’ अटकेत असलेल्या ‘चाणक्य’ कुमार आणि त्यांच्या साथीदारांना हाताशी धरून, नियमांची गंगा उलटी वाहण्यासाठी लाखो रुपयांच्या ‘प्रसादा’चा नैवेद्य दाखवल्याचा घणाघाती आरोप होत आहे. याच ‘प्रसादा’च्या मोबदल्यात, प्रशासकीय नियमावलीला कचऱ्याची टोपली दाखवून त्या ‘सोनिया’ लिपिकाला बेकायदेशीरपणे प्राथमिक विभागात सामावून घेण्याचा घाट रचण्यात आला.

‘चाणक्य’च्या चौकशीतून उघड झाली ‘ज्ञानसागर’ची घागर!

‘चाणक्य’ कुमार आणि त्यांच्या साथीदारांची पोलिसांनी कोठडीत कसून ‘उजळणी’ घेतली असता, त्यांच्या आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे थेट ‘ज्ञानसागर’ संस्थेच्या तिजोरीपर्यंत पोहोचले. या तिघांनीच पोपटासारखे बोलत या ‘पवित्र’ त्रिमूर्तींसोबत झालेल्या ‘अर्थ’पूर्ण संवादाची आणि व्यवहाराची कबुली दिल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. एका माजी ‘सिंघम’ अधिकाऱ्याचाच या ‘प्रेरणादायी’ कारस्थानात समावेश असल्याने, शिक्षण क्षेत्रासह प्रशासकीय वर्तुळातही भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत.

या प्रकरणामुळे ‘ज्ञानसागर’ संस्थेत सध्या स्मशानशांतता पसरली असून, आरोप झालेले ‘आदर्श’ पदाधिकारी ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. एका बाजूला विवेकानंदांच्या आदर्शाच्या गप्पा मारायच्या आणि दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराच्या गंगेत डुबक्या मारायच्या, या दुटप्पी भूमिकेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. लवकरच या ‘त्रिमूर्तींना’ चौकशीसाठी समन्स बजावले जाणार असून, त्यांच्यावरही अटकेची कुऱ्हाड कोसळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता ‘ज्ञानसागर’मधील आणखी कोणते ‘मोती’ बाहेर येतात, याकडे संपूर्ण शिक्षणनगरीचे डोळे लागले आहेत.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!