टकल्या डोंगर परिसरात दहशत माजवणाऱ्या सराईताच्या मुसक्या आवळल्या! गंगापूर पोलिसांच्या धडक कारवाईने नागरिकांचा सुटकेचा निःश्वास!

तडीपारीच्या आदेशाला केराची टोपली दाखवून शहरात माजवत होता उच्छाद; गुन्हे शोध पथकाने सापळा रचून केले जेरबंद.

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. २८: सर्वसामान्य नागरिकांना धमकावून त्यांच्यात दहशत निर्माण करणाऱ्या आणि पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या कुख्यात गुन्हेगाराला जेरबंद करण्यात गंगापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मोठे यश आले आहे. राहिल नुरुद्दीन सैय्यद असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून, त्याच्या अटकेमुळे टकल्या डोंगर आणि संभाजी चौक परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे

गेल्या काही दिवसांपासून टकल्या डोंगर परिसरात राहिल सैय्यद याची मोठी दहशत निर्माण झाली होती. तो स्थानिक रहिवाशांना धमक्या देऊन पैशांची मागणी करत होता. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे आणि दहशतीमुळे कोणीही नागरिक त्याच्याविरोधात तक्रार करण्यास पुढे येत नव्हते. ही बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या कानावर आली. त्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील आणि त्यांच्या टीमला या गुन्हेगाराला कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, दि. २६ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पोउनि. पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत हुशारीने टकल्या डोंगर परिसरात सापळा रचला. पोलिसांच्या येण्याची चाहूल लागताच राहिल सैय्यदने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र आधीच सज्ज असलेल्या पोलिसांनी क्षणार्धात त्याच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी राहिल सैय्यदची कसून चौकशी केली असता, तो केवळ दहशतच माजवत नव्हता, तर अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असल्याचेही उघड झाले. गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्यात (गु.र.नं. १७५/२०२५) तो पोलिसांना हवा होता. इतकेच नव्हे, तर नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राहावी यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ यांनी त्याला नाशिक शहरातून तडीपार करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखवून तो शहरात बिनधास्तपणे वावरत होता आणि गुन्हेगारी कारवाया करत होता.

त्याच्यावर यापूर्वीही गंगापूर आणि सातपूर पोलीस ठाण्यात मारामारी, दंगल, अवैध शस्त्र बाळगणे असे एकूण ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये नवीन गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत, पोउनि. भारत पाटील, आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ही धाडसी कामगिरी केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!