नाशिक: (विशेष प्रतिनिधी) – उपनगर आणि नाशिकरोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून डोके वर काढणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर उपनगर पोलिसांनी सलग तीन धडक कारवाया करत जोरदार प्रहार केला आहे. एका मोठ्या कारवाईत एमडी या घातक अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत दोघांना अटक केली, तर त्यांच्या म्होरक्याकडून दोन गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. दुसऱ्या दोन कारवायांमध्ये, नशा करण्यासाठी आणि पैशांसाठी ट्रक चालकांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोन वेगवेगळ्या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या ‘ट्रिपल स्ट्राइक’ कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी एकूण १ लाख ७४ हजार रुपयांच्या एमडीसह लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त श्री. किशोर काळे, आणि सहायक पोलीस आयुक्त श्री. सचिन बारी यांनी नाशिक शहरातील अवैध अमली पदार्थ विक्रेते आणि जबरी चोरांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने या कारवाया फत्ते केल्या.
थरारक कारवाई: एमडी आणि पिस्तूल जप्त
गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार सुरज गवळी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, जुना सायखेडा रोडवरील दुर्गा माता मंदिराजवळ एक तरुण एमडी विकण्यासाठी येणार होता. या माहितीच्या आधारे पोउनि प्रभाकर सोनवणे आणि त्यांच्या पथकाने (पोहवा संदीप पवार, विनोद लखन, पो.अं सुरज गवळी, गौरव गवळी, प्रशांत देवरे, पंकज कर्पे, गायकवाड) परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे एक तरुण मोटरसायकलवर तिथे आला. पोलिसांना संशय येताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने शिताफीने त्याला जागीच पकडले
त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ५ ग्रॅम एमडी, रोख ९ हजार रुपये, एक मोटरसायकल आणि दोन मोबाईल असा एकूण १,१८,१०० रुपयांचा मुद्देमाल सापडला. त्याची नावे सौरभ दिगंबर महाले (वय २७) आणि कौस्तुभ धनंजय ईखनकर (वय २४) अशी असल्याचे समोर आले. त्यांच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा (गु.र.नं ४११/२०२५) दाखल करण्यात आला.
आणि सूत्रधार जाळ्यात!
आरोपींच्या चौकशीत हा माल जयभवानी रोड येथील सराईत गुन्हेगार इशीद चौधरी याच्याकडून खरेदी केल्याचे उघड झाले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तात्काळ इशीद चौधरीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून आणखी ५ ग्रॅम एमडी आणि धक्कादायक म्हणजे दोन गावठी बनावटीचे पिस्तूल असा एकूण ५६,००० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. चौधरी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या कारवाईत पोलिसांनी एकूण १,७४,१०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
जबरी चोऱ्यांचा पर्दाफाश: दोन्ही टोळ्या जेरबंद
१: ट्रक चालकाला चाकूचा धाक
वाराणसी येथील ट्रक चालक श्री. कृष्णाअवतार राजभर यांना गोदावरी नदीजवळ अडवून चाकूचा धाक दाखवत ९,२०० रुपये रोख आणि मोबाईल हिसकावण्यात आला होता. याप्रकरणी (गु.र.नं ३८२/२०२५) गुन्हा दाखल होता. गुन्हे शोध पथकाने अथक परिश्रम घेत या गुन्ह्यातील मुख्य आरोपी कार्तिक उद्धव गोरे (वय २६, रा. श्रमिक नगर) याला अटक केली. तो देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याने त्याचे साथीदार करण धोत्रे, गणेश डोंगरे, अविनाश धोत्रे, मनोज धोत्रे यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून चोरीचा १०,००० रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला असून, फरार साथीदारांचा शोध सुरू आहे.
२: “नशेसाठी पैसे दे, नाहीतर…“
एका अन्य घटनेत, संतोष कुमार बसियाल या परराज्यातील व्यक्तीला “पेट्रोल संपले आहे” असे सांगून मदतीच्या बहाण्याने थांबवले. त्यानंतर आरोपींनी धारदार चाकूचा धाक दाखवून, “नशा करण्यासाठी पैसे दे नाहीतर खुपसून टाकू,” अशी धमकी दिली. त्यांनी २,००० रुपये रोख आणि ५,००० रुपये क्यूआर कोडद्वारे जबरदस्तीने घेतले होते. या गुन्ह्याचा (गु.र.नं ४०५/२०२५) तपास करत पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने अजीम मुश्ताक शेख (वय २०), अर्कम आशपाक पिंजारी (वय २४) आणि एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली १०,००० रुपयांची मोटरसायकल, एक मोबाईल आणि स्टीलचा चाकू असा १५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या यशस्वी कारवाया वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि संजय फुलपगारे (गुन्हे), पोउनि प्रभाकर सोनवणे, पोउनि हरसिंग पावरा, पोउनि शशिकांत पवार आणि गुन्हे शोध पथकातील संदीप पवार, विनोद लखन, पंकज कर्पे, सुरज गवळी, गौरव गवळी, प्रशांत देवरे, जयंत शिंदे, सुनील गायकवाड, संदेश रघतवान, अनिल शिंदे, अमोल वाळके, गोविंद भामरे यांच्या पथकाने केल्या आहेत. या कारवाईमुळे तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. अमली पदार्थांची विक्री किंवा सेवन होत असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन नाशिक शहर पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.







