गुन्हे शाखेचा ‘आरंभ’ स्पावर धडक छापा; दिल्ली, बिहारसह विविध राज्यांतील ५ पीडित तरुणींची सुटका, महिला चालक जेरबंद.
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. २२: शहराच्या गजबजलेल्या मुंबईनाका परिसरात, मसाज पार्लरच्या गोंडस नावाखाली सुरू असलेल्या एका मोठ्या कुंटणखान्याचा मध्यवर्ती गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. ‘आरंभ स्पा’ नावाच्या या केंद्रावर पोलिसांनी धडक कारवाई करत, देहव्यापाराच्या दलदलीत ढकलल्या गेलेल्या ५ पीडित तरुणींची सुटका केली. या रॅकेटची मुख्य सूत्रधार असलेल्या खुशबू परेश सुराणा नावाच्या सराईत महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी शहरातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्री. किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त श्री. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांचे पथक शहरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना मुंबईनाका येथील मेट्रोझोन समोरील एका व्यावसायिक गाळ्यात ‘आरंभ स्पा’च्या नावाखाली बाहेरच्या राज्यांतून मुलींना आणून वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याची खळबळजनक आणि गोपनीय माहिती मिळाली.
माहितीची खातरजमा होताच, गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून मंगळवारी (दि. २१) रात्री उशिरा ‘आरंभ स्पा’वर छापा टाकला. आतमध्ये सुरू असलेला प्रकार पाहून पोलीसही चक्रावले. या ठिकाणी कानपूर, दिल्ली, बिहार, मिझोराम या राज्यांतून आणलेल्या, तसेच नाशिकमधील एका तरुणीसह एकूण पाच पीडित महिला आढळून आल्या.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत, स्पाची चालक खुशबू परेश सुराणा ही या तरुणींना पैशांचे आमिष दाखवून आणि धाक दाखवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी देहव्यापार करण्यास भाग पाडत असल्याचे उघड झाले. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी खुशबू सुराणा ही सराईत गुन्हेगार असून, तिच्यावर यापूर्वीही पिटा (PITA) आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत.
याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात आरोपी खुशबू सुराणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गुन्हे शाखेने केलेल्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.







