दानवे यांचा गौरव, फडणवीस-पवार एकत्र!
लाल 🚨 दिवा-मुंबई, दि. १६ – “एसटी बस चालकाचा मुलगा आपल्या कर्तृत्वाच्या बळावर राज्य विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, ही बाब अभिमानास्पद आहे. कोणी कुठेही जन्माला आला तरी आपल्या कर्तृत्वाने मोठा होऊ शकतो, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आणि लोकशाहीने सामान्यांना दिलेली मोठी देणगी आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्याचा गौरव केला. तर, “अंबादास दानवे हे विधानपरिषदेतील चर्चेची उंची वाढवणारे आणि संयमी, परखड भूमिका मांडणारे विरोधी पक्षनेते होते,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधानपरिषदेतील कार्यकाळ २९ ऑगस्ट रोजी पूर्ण होत असून, त्यानिमित्त आयोजित निरोप समारंभात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विविध विभागांचे मंत्री यांच्यासह गटनेते व सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, योगशास्त्रात एम.ए
., पत्रकारितेचा अनुभव आणि मराठवाडा विभागात बारावीमध्ये गुणवत्ता यादीत सहावे स्थान मिळवणाऱ्या दानवे यांनी जनतेच्या प्रश्नांची समज, ठाम भूमिका, विविध संस्थांबरोबर सामाजिक, क्रीडा आणि आध्यात्मिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे वेगळी ओळख निर्माण केली. अनेक आंदोलने उभारून ती यशस्वी केली.
उपमुख्यमंत्री पवार यांनी दानवे यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना सांगितले, “दानवे हे परखडपणे प्रश्न मांडणारे, अभ्यासू आणि सभागृहाच्या डेकोरमचे भान राखणारे नेते होते. त्यांनी कायम सामान्य जनतेचे प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडले.”
दानवे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानत भावुक शब्दांत आपल्या कार्यकाळाचा आढावा घेतला. “ही संधी मला जनतेच्या प्रश्नांना आवाज देण्यासाठी मिळाली, याचे समाधान आहे,” असे ते म्हणाले. या निरोप समारंभात एकात्मता, सन्मान आणि सदिच्छा यांचा भाव दिसून आला. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह सदस्य सर्वश्री उद्धव ठाकरे, प्रवीण दरेकर, ॲड. अनिल परब, सतेज पाटील, शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते.







