जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे आश्वासन; आखाड्यांच्या प्रतिनिधींसोबत साधला संवाद
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. २८ : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या विविध विकास कामांना गती देण्यात येणार असून, सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज दिली. कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात शहरातील विविध आखाड्यांचे साधू-महंत आणि प्रतिनिधी यांच्याशी त्यांनी थेट संवाद साधला. यावेळी साधू-महंतांच्या अडी-अडचणी आणि सूचना ऐकून घेत त्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
येथील भक्तीधाम येथे आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी कुंभमेळा नियोजनाचा आढावा घेतला. या बैठकीला अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री जितेंद्रानंद सरस्वती, आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते भक्तीचरणदास महाराज, कैलास मठाचे महंत स्वामी संविदानंद सरस्वती, दिगंबर आखाड्याचे महंत रामकिशोरदास शास्त्री, तपोवनातील बडा लक्ष्मीनारायण मंदिराचे रामशरणदास महाराज, महंत माधवदास राठी, तुषार भोसले यांच्यासह विविध आखाड्यांचे प्रमुख प्रतिनिधी आणि संत-महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकास कामांना वेग देणार
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले की, “आगामी कुंभमेळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. ज्या विकास कामांना अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे, अशा कामांची निविदा प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कोणतीही अडचण न येता सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण होतील, याची आम्ही विशेष दक्षता घेत आहोत.” प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, साधू-महंतांशी नियमित संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातील आणि त्यांच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून त्यावर तातडीने कार्यवाही केली जाईल.
साधूग्रामच्या भूसंपादनाला गती
कुंभमेळ्यातील सर्वात महत्त्वाचा भाग असलेल्या साधूग्रामच्या उभारणीसाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यात आल्याची माहितीही जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिली. ते म्हणाले, “साधूग्रामसाठी जागेची निश्चिती आणि भूसंपादनाची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण केली जात आहे, जेणेकरून पुढील कामांचे नियोजन करणे सोपे होईल.”
**लवकरच त्र्यंबकेश्वर येथेही बैठक**
नाशिकप्रमाणेच त्र्यंबकेश्वर येथेही कुंभमेळ्याची मोठी तयारी करावी लागते. या पार्श्वभूमीवर लवकरच त्र्यंबकेश्वर येथील साधू-महंतांशी स्वतंत्रपणे संवाद साधून तेथील कामांचा आणि समस्यांचा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत उपस्थित साधू-महंतांनी प्रशासनासमोर आपल्या अपेक्षा आणि काही मौलिक सूचना मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने रस्ते, वीज, पाणी, स्वच्छता आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व सूचनांची नोंद घेतली असून त्यांची लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या बैठकीमुळे कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असून, प्रशासन आणि साधू-महंत यांच्यात सकारात्मक समन्वयाचे वातावरण निर्माण झाले आहे







