सिडकोत पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणारा कुख्यात गुंड जेरबंद!

गुन्हे शाखा युनिट १ ची धडाकेबाज कारवाई; ३० हजारांचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त

लाल 🚨 दिवानाशिक, ता. २६: शहरात गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानंतर गुन्हे शाखा ॲक्शन मोडमध्ये आली आहे. सिडको परिसरात देशी बनावटीचे पिस्तोल कमरेला लावून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आणि हत्या, दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या कुख्यात गुन्हेगार अविनाश वाणी याच्या अखेर गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. अत्यंत शिताफीने रचलेल्या सापळ्यात हा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस हवालदार प्रशांत मरकड आणि विशाल काठे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून एक खात्रीशीर खबर मिळाली. रेकॉर्डवरील गुन्हेगार अविनाश वाणी हा दत्त चौक, सिडको परिसरात पिस्तोल घेऊन फिरत असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याची माहिती मिळताच, पथकाने वरिष्ठांना याची कल्पना दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमजवळ सापळा रचला. संशयित आरोपी दिसताच, पोलिसांनी कोणताही गोंधळ होऊ न देता अत्यंत हुशारीने त्याला घेरले आणि ताब्यात घेतले.

अविनाश राऊसाहेब वाणी (वय ३०, रा. रविवार पेठ) असे या आरोपीचे नाव असून, त्याची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यातून ३०,००० रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तोल आणि ५०० रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण ३०,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

  • खुनाच्या गुन्ह्यातही आहे आरोपी

अविनाश वाणी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपीवर अंबड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पुढील तपासासाठी अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही धाडसी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि त्यांच्या संपूर्ण टीमने (पोउनि चेतन श्रीवंत, प्रशांत मरकड, विशाल काठे, संदीप भांड, प्रदिप म्हसदे, विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, नाजीमखान पठाण, अमोल कोष्टी व इतर) यशस्वीपणे पार पाडली.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!