शहरातील गुन्हेगारी वर्चस्वाची लढाई पुन्हा रक्ताच्या उंबरठ्यावर; फुलेनगर परिसरात गँगवॉरचे सावट.

खुनाचा आणि दरोड्याचा आरोप असलेले सराईत गुन्हेगार विकी वाथ, जय खरात यांचा टोळीसह मध्यरात्री धुडगूस.

लाल 🚨 दिवा-पंचवटी पोस्ट, दि.२४:-नाशिक:शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमधील वर्चस्ववादाची लढाई पुन्हा एकदा उफाळून आली असून, पंचवटीतील फुलेनगर परिसर मंगळवारी मध्यरात्री गोळीबाराच्या आवाजाने अक्षरशः हादरला. खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळक्याने जुन्या वादातून एका तरुणाच्या घरावर हल्ला चढवला. दगडफेक, शिवीगाळ करत दहशत माजवल्यानंतर या टोळक्याने थेट गोळीबार केल्याने संपूर्ण परिसरात थरकाप उडाला आहे. या घटनेने गँगवॉरच्या चर्चांना पुन्हा तोंड फुटले असून, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

याप्रकरणी पीडित तरुण सुमित दयानंद महाले (वय २१) याच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार विकास उर्फ विकी वाथ, ऋषीबाबा परसे, जय संतोष खरात, जय मोरे उर्फ टिंगरी आणि त्यांच्या ४ ते ५ अज्ञात साथीदारांवर हत्येचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमवून दहशत माजवणे आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

  • मध्यरात्री असा घडला थरार…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास विकी वाथ आणि त्याच्या साथीदारांनी फुलेनगरमधील सैलानी महाराज कमानीजवळ जमून आरडाओरड सुरू केली. गुन्हेगारी वर्चस्व सिद्ध करण्याच्या इराद्याने त्यांनी थेट सुमित महाले याच्या घराकडे मोर्चा वळवला. जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी त्यांनी सुमित व त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या देत अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. काही कळायच्या आतच या गुंडांनी घराच्या दिशेने जोरदार दगडफेक सुरू केली. या अनपेक्षित हल्ल्याने महाले कुटुंबियांसह परिसरातील नागरिक प्रचंड घाबरले. मात्र, या गुंडांचा क्रूरपणा इथेच थांबला नाही. परिसरावर आपली दहशत बसवण्यासाठी आणि सुमितचा काटा काढण्याच्या उद्देशाने टोळक्याने त्याच्या दिशेने गोळी झाडली. सुदैवाने सुमित या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला. या घटनेनंतर संपूर्ण टोळके अंधाराचा फायदा घेत फरार झाले.

आरोपी नव्हे, अट्टल गुन्हेगार!

या हल्ल्यातील मुख्य सूत्रधार विकी वाथ आणि जय खरात हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहेत. विकी वाथवर यापूर्वी खुनाचा (भादंवि ३०२) आणि खुनाच्या प्रयत्नाचा (भादंवि ३०७) गुन्हा नोंद आहे. तर, जय खरातवर दरोडा (भादंवि ३९७), खुनाचा प्रयत्न (भादंवि ३०७) यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. असे खतरनाक गुन्हेगार खुलेआम फिरून शहरात दहशत माजवत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१), सहायक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. न्यायवैद्यक पथकाने घटनास्थळावरून गोळीची पुंगळी आणि इतर महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना गजाआड करण्यासाठी विविध पथके रवाना झाली असून, शहरात कसून शोधमोहीम सुरू आहे. मात्र, भर वस्तीत झालेल्या या गोळीबारामुळे शांत शहर पुन्हा एकदा गँगवॉरच्या छायेखाली आल्याची भीती व्यक्त होत आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!