व्याजाच्या चक्रव्युहात अडकलेल्या तरुणाची जीवनयात्रा संपली; दोन आरोपींना बेड्या, तिसरा फरार!
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि.५ सप्टेंबर:अवैध सावकारीचा राक्षस पुन्हा एकदा शहरात सक्रिय झाला असून, व्याजाच्या पैशासाठी होणाऱ्या सततच्या तगाद्याला आणि मानसिक छळाला कंटाळून एका ३९ वर्षीय तरुणाने आपले जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना शिवाजी नगर परिसरात घडली आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या एका चिठ्ठीत या तरुणाने आपल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली असून, या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन सावकारांना जेरबंद केले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, राजेंद्र भगवान परदेशी (वय ३९, रा. शारदा अपार्टमेंट, ध्रुव नगर) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. गेल्या चार वर्षांपासून राजेंद्र हे आर्थिक विवंचनेत होते. त्यांनी शामराव पाटील उर्फ गिरणारकर (वय ५३) याच्याकडून तब्बल ४ लाख ७० हजार रुपये दरमहा ६ टक्के व्याजदराने, तर नंदु बच्छाव (रा. लखमापूर) याच्याकडून ३ लाख रुपये दरमहा ४ टक्के व्याजदराने घेतले होते.
मात्र, घेतलेल्या कर्जापेक्षा व्याजाचा डोंगर मोठा झाला होता. आरोपी शामराव पाटील, त्याचा साथीदार मोहन खोडे (वय ४५) आणि नंदु बच्छाव हे तिघेही पैशांसाठी राजेंद्र यांच्यामागे हात धुवून लागले होते. सततचा तगादा, अपमान आणि धमकीमुळे राजेंद्र पूर्णपणे खचून गेले होते. या असह्य त्रासातून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी अखेर मृत्यूला कवटाळले.
आत्महत्या करण्यापूर्वी राजेंद्र यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, ज्यात त्यांनी शामराव पाटील, मोहन खोडे आणि नंदु बच्छाव यांच्यामुळेच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले. ही चिठ्ठी त्यांचे भाऊ अनिल भगवान परदेशी यांच्या हाती लागताच त्यांनी तात्काळ गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सपोनि शांताराम महाजन यांनी वेगाने सूत्रे हलवली. अनिल परदेशी यांच्या फिर्यादीवरून आरोपी शामराव पाटील, मोहन खोडे आणि नंदु बच्छाव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियमाच्या कलम ३९ व ४५ अन्वये गुन्हा (गुरनं २१५/२०२५) दाखल करण्यात आला. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवून आरोपी शामराव पाटील आणि मोहन खोडे यांच्या मुसक्या आवळल्या, तर तिसरा आरोपी नंदु बच्छाव हा फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
या घटनेमुळे शहरात अवैध सावकारीचे जाळे किती खोलवर पसरले आहे, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सपोनि शांताराम महाजन या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







