आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशावर गुन्हे शाखेची वादळी कारवाई; दारुडे, ट्रीपल सीटवाल्यांची उडाली झोप!
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. ०२ ऑक्टोबर, २०२५:शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना टवाळखोरांच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशानंतर, गुन्हे शाखेने सातपुर परिसरात एक धडक मोहीम राबवून खळबळ उडवून दिली आहे. काल (दि. ३०) सायंकाळच्या वेळी अचानक झालेल्या या ‘कोम्बिंग ऑपरेशन’मध्ये तब्बल ९२ टवाळखोरांना ताब्यात घेण्यात आले, ज्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना चांगलाच चाप बसला असून, परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातपुर औद्योगिक वसाहत आणि रहिवासी परिसरात टवाळखोरांचा उपद्रव वाढल्याच्या तक्रारी येत होत्या. रस्त्यात मद्यपान करणे, भरधाव वेगात ट्रीपल सीट दुचाकी चालवणे, मोकळ्या मैदानांवर जमून गोंधळ घालणे अशा प्रकारांनी नागरिक त्रस्त झाले होते. या गंभीर समस्येची दखल घेत पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश गुन्हे शाखेला दिले होते.
त्यानुसार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक पोलीस आयुक्त श्री. संदीप मिटके व श्री. शेखर देशमुख यांच्या कुशल नेतृत्वात कारवाईचा धडाकेबाज आराखडा तयार करण्यात आला. या मोहिमेत केवळ एकाच शाखेला न ठेवता, मध्यवर्ती गुन्हे शाखा, युनिट-२, गुंडा पथक, सायबर पोलीस, विशेष शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथक आणि सातपूर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक अशा विविध विभागांची फौज तयार करण्यात आली. प्रत्येक पथकात एक अधिकारी आणि दहा अंमलदार यांचा समावेश होता.
काल सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास, विविध पथकांनी एकाच वेळी सातपुर परिसराला वेढा घातला. काही कळण्याच्या आतच, पोलिसांच्या गाड्या धडकू लागल्या आणि टवाळखोरांची पळापळ सुरू झाली. रस्त्यात उभे राहून धिंगाणा घालणारे, अंधाराचा फायदा घेऊन मैदानांवर दारूच्या पार्ट्या करणारे आणि वाहतुकीच्या नियमांना केराची टोपली दाखवणारे ट्रिपल सीट रायडर्स पोलिसांच्या जाळ्यात अलगद सापडले. अवघ्या तीन तासांच्या या वादळी कारवाईत एकूण ९२ जणांना ताब्यात घेऊन थेट पोलीस स्टेशनला आणण्यात आले. त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ११२ आणि ११७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
या यशस्वी कारवाईनंतर, नाशिक शहरातील इतर पोलीस स्टेशन हद्दीतही अशाच प्रकारची अचानक कारवाई करून टवाळखोरीचा समूळ नायनाट करण्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केला आहे. या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना जबर हादरा बसला असून, पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वसामान्य नागरिकांकडून कौतुक होत आहे. या मोहिमेत वपोनि. रणजित नलवडे, सपोनि. माळी, हेमंत तोडकर, मोहिते आणि पाटील यांच्यासह संपूर्ण पथकाने मोलाची कामगिरी बजावली.







