पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या ‘डिजिटल’ कार्यशैलीचे सर्वत्र कौतुक; पीडित पित्याला मध्यरात्री मिळाला न्यायाचा दिलासा.
लाल 🚨 दिवा -नाशिक,दि.२०:-जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, जेव्हा भीती आणि हताशा माणसाला घेरते, तेव्हा आशेचा एक किरणही पुरेसा असतो. नाशिकमधील एका पीडित पित्यासाठी हा आशेचा किरण ठरला, तो म्हणजे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा व्हॉट्सॲप क्रमांक! मुलीच्या आयुष्याची राखरांगोळी करण्याची धमकी देणाऱ्या आणि तलवारीचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या गुंडांपुढे हतबल झालेल्या या पित्याने मध्यरात्री थेट आयुक्तांना संदेश पाठवला आणि पुढच्या काही मिनिटांतच संपूर्ण पोलीस यंत्रणा जागी झाली. ही घटना म्हणजे नाशिक पोलिसांच्या नव्या, लोकाभिमुख आणि तंत्रज्ञानस्नेही ‘भरोसा पॅटर्न’चाच एक उत्तम नमुना आहे.

- +919923323311. What’s up
- काय होती ती काळरात्र?
जेलरोड परिसरात राहणाऱ्या एका प्रतिष्ठित व्यावसायिकाच्या कुटुंबावर गेल्या काही महिन्यांपासून एका काळ्या वादळाचे सावट होते. त्यांच्या मुलीच्या एका अयशस्वी वैवाहिक संबंधातून आरोपी तरुण तिचा सतत पाठलाग करत होता. प्रकरण घटस्फोटासाठी न्यायालयात असतानाही, “तुमच्या मुलीला समाजात कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही,” अशी धमकी देत त्याने फारकतीसाठी ५ लाख रुपयांची मागणी केली होती.
हा मानसिक छळ सुरू असतानाच, १६ जुलैची रात्र त्या कुटुंबासाठी काळरात्र ठरली. रात्री साडेनऊच्या सुमारास, पीडित व्यावसायिक घरी परतले असता, आरोपी त्याच्या दोन साथीदारांसह मोटारसायकलवरून आला. क्षणाचाही विचार न करता त्याने कमरेला लावलेली तलवार बाहेर काढली आणि व्यावसायिकाच्या दिशेने धावला. “आज फैसला करूनच टाकतो, ५ लाख दे नाहीतर तुझा आणि तुझ्या मुलीचा गेमच करतो,” अशी किंकाळी फोडत त्याने व्यावसायिकावर हल्ला केला आणि त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अवघ्या काही क्षणांत हा थरार घडला आणि आरोपी पसार झाले.
- आणि… आयुक्तांचा मोबाईल खणखणला!
रक्तबंबाळ शरीरापेक्षाही मनावर झालेल्या जखमा खोल होत्या. मुलीच्या भविष्याच्या चिंतेने वडिलांचा जीव कासावीस झाला. अशा हतबल क्षणी त्यांना कुठूनतरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा व्हॉट्सॲप क्रमांक मिळाल्याची आठवण झाली. ‘प्रयत्न तर करून पाहूया’ या एकाच विचाराने त्यांनी थरथरत्या हातांनी आयुक्तांना घडलेल्या प्रकाराची माहिती देणारा संदेश पाठवला.
आणि चमत्कार घडला! मध्यरात्रीच्या वेळी पाठवलेला तो संदेश केवळ ‘सीन’ झाला नाही, तर काही मिनिटांतच आयुक्तांच्या कार्यालयातून पीडित पित्याच्या मोबाईलवर फोन आला. “घाबरू नका, आयुक्त साहेबांनी तुमचा मेसेज वाचला आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत. उपनगर पोलीस ठाण्याचे पथक तुमच्या मदतीसाठी तात्काळ निघत आहे,” या शब्दांनी त्या पित्याच्या जीवात जीव आला.
पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार!
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या एका आदेशाने उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयवंत शिरसाट आणि त्यांचे पथक जणू ‘सिंघम’ अवतारात आले. त्यांनी तात्काळ पीडित व्यावसायिकाचे घर गाठले, त्यांना धीर दिला आणि संपूर्ण हकीकत ऐकून घेतली. मध्यरात्रीच आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, खंडणी, पाठलाग करणे आणि शस्त्र अधिनियमांतर्गत अत्यंत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
केवळ गुन्हा दाखल करून पोलीस थांबले नाहीत. आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून, आरोपींच्या संभाव्य लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकण्यासाठी विशेष पथके रवाना झाली आहेत. “आरोपी पाताळात लपले तरी त्यांना शोधून काढू आणि कायद्याचा हिसका दाखवू,” असा विश्वास पोलिसांनी पीडित कुटुंबाला दिला आहे.
या घटनेने एक गोष्ट सिद्ध केली आहे की, नाशिकमध्ये आता सामान्य माणसाचा आवाज थेट पोलीस दलाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यापर्यंत पोहोचू शकतो. आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरू केलेली ही ‘डिजिटल संवाद’ परंपरा गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ तर सामान्य नागरिकांसाठी मोठा आधार ठरत आहे. पीडित पित्याने अश्रूंना वाट मोकळी करून देताना “माझ्यासाठी तर आयुक्त साहेब आणि नाशिक पोलीस देवदूत बनून आले,” या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.







