सेफ सिटी’ नाशिकचे स्वप्न भंगले! म्हसरूळमधील धाडसी घरफोडीने नागरिक भयभीत, कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा.

पोलिस दल गाढ झोपेत, चोरट्यांचे मोकळे रान; ज्येष्ठ नागरिकाच्या घरातून सोने-चांदीसह लाखोंची लूट, रात्रगस्तीचा उडाला बोजवारा!

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. २७: शहर पोलिस दलाचा वचक केवळ कागदावरच उरला आहे की काय, असा संतप्त सवाल विचारण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे. म्हसरूळ पोलिसांच्या हद्दीत, दिंडोरी रोडसारख्या गजबजलेल्या परिसरात चोरट्यांनी अक्षरशः थैमान घालत एका बंद घराचे कुलूप तोडून तब्बल २ लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस आयुक्त ‘स्मार्ट सिटी’ला ‘सेफ सिटी’ बनवण्याच्या घोषणा करत असताना, दुसरीकडे चोरटे मात्र पोलिसांच्या नाकावर टिच्चून आपली ‘तिजोरी’ भरत आहेत. या घटनेमुळे पोलिसांच्या रात्रगस्तीचा दावा किती पोकळ आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

  • काय आहे नेमके प्रकरण?

म्हसरूळ येथील गुलमोहर नगरातील कल्पराज सोसायटीत राहणारे ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक श्री. सुभाषचंद्र मानकलाल जैन हे आपल्या पत्नीसह २० मे रोजी पुण्याला मुलाकडे गेले होते. त्यांची पाठ फिरताच, जणू काही याच संधीची वाट पाहणाऱ्या चोरट्यांनी आपला डाव साधला. शुक्रवार, दि. २६ जुलैच्या मध्यरात्रीच्या अंधाराचा फायदा घेत, अज्ञात चोरट्यांनी श्री. जैन यांच्या बी-७ क्रमांकाच्या फ्लॅटच्या दरवाजाचा कोयंडा एखाद्या निष्णात सराईताप्रमाणे तोडला आणि घरात प्रवेश केला.

घरात कोणी नसल्याची खात्री असल्याने चोरट्यांनी निर्धास्तपणे बेडरूममधील दोन लोखंडी कपाटे उघडून अक्षरशः धुमाकूळ घातला. कपाटात आयुष्यभराची पुंजी म्हणून जपून ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम पाहून चोरट्यांचे डोळे दिपले असावेत. त्यांनी कपाटातील तब्बल २,७३,०००/- रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ केला. यात १,१०,०००/- रुपयांच्या सोन्याच्या गिन्या, ४५,०००/- रुपयांचे मंगळसूत्र, ७०,०००/- रुपयांचे चांदीचे शिक्के, ३०,०००/- रुपयांच्या चांदीच्या वड्या, १३,०००/- रुपयांचे चांदीचे पायल आणि ५,०००/- रुपयांची रोकड असा ऐवज होता. एवढ्यावरच न थांबता, याच चोरट्यांनी शेजारी राहणारे श्री. जालींदर कुमार यादव यांच्याही घरातून ४,०००/- रुपयांची रोकड लंपास केली.

पोलिसांची सुस्त कारवाई आणि पंचनाम्याचा फार्स!

एकाच रात्री दोन घरांवर डल्ला मारून चोरटे पसार झाले, तरी रात्रभर गस्त घालणारे पोलिस होते तरी कुठे? हा प्रश्न अनुत्तरित आहे. घटनेची माहिती मिळताच, म्हसरूळ पोलिस ठाण्याचे तपासिक अंमलदार, पोलिस उपनिरीक्षक दिपक पटारे आणि त्यांचे सहकारी सायंकाळी तब्बल १८:४० वाजता घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनाम्याचा सोपस्कार पार पाडला आणि नेहमीप्रमाणेच अज्ञात आरोपींविरोधात म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा (गुरनं २०९/२०२५) दाखल केला. मात्र, आरोपींचा कोणताही सुगावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांचे हात अद्याप रिकामेच असून, आरोपी मोकाट फिरत आहेत.

या घटनेमुळे दिंडोरी रोड परिसरात भीतीचे सावट पसरले असून, आपल्या घरांच्या सुरक्षिततेबद्दल नागरिक धास्तावले आहेत. “पोलिस फक्त हप्ते गोळा करण्यात आणि कागदी घोडे नाचवण्यात मग्न आहेत का? सामान्य माणसाच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण कोण करणार?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. आता वरिष्ठ पोलिस अधिकारी या प्रकरणात केवळ औपचारिकता पूर्ण करणार की प्रत्यक्ष कारवाई करून नाशिककरांना सुरक्षेची हमी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!