रक्ताचा खेळ घरातच! पोलिसांच्या धाडीत गोवंश कत्तलीचा धक्कादायक प्रकार उघड!

मुंबईनाका पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ८० किलो गोमांसासह दोघांना बेड्या, एक फरार !

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. २८: शहराच्या अत्यंत गजबजलेल्या आणि रहिवासी वस्तीत चक्क एका फ्लॅटमध्ये गोवंश कत्तलखाना चालवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईनाका पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी ८० किलो गोमांस जप्त केले असून दोघांना रंगेहाथ अटक केली आहे, तर त्यांचा एक साथीदार पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, सह्याद्री हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या राधे सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये काहीतरी काळेबेरे सुरू असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानुसार, गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी मुंबईनाका पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक परिसरात गस्त घालत होते. त्याचवेळी, पोशि गणेश बोरणारे यांना एका खबऱ्यामार्फत राधे सोसायटीतील फ्लॅट नंबर ०२ मध्ये गोवंशाची कत्तल करून त्याचे मांस विकले जात असल्याची पक्की खबर मिळाली.

या माहितीची खातरजमा करून आणि वरिष्ठांकडून परवानगी मिळवून, गुन्हे शोध पथकाने गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास सदर फ्लॅटभोवती सापळा रचला. पोलिसांनी घरात प्रवेश केला असता, तेथील दृश्य अत्यंत धक्कादायक होते. घराच्या हॉलमध्येच गोवंशाची कत्तल करून त्याचे तुकडे केले जात होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मांस आणि कत्तलीचे साहित्य पाहून पोलीसही चक्रावले.

पोलिसांची चाहूल लागताच, तेथे उपस्थित असलेल्या तीन इसमांपैकी एकाने धूम ठोकली. मात्र, पोलिसांनी अत्यंत शिताफीने दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांची नावे अरबाज अस्लम कुरेशी (वय २८) आणि दानिश रफिक कुरेशी (वय ३०) अशी आहेत. पळून गेलेल्या साथीदाराचे नाव शोएब समद कुरेशी (वय ३४) असल्याचे त्यांनी सांगितले.

घटनास्थळावरून पोलिसांनी कत्तल केलेले सुमारे ८० किलो गोमांस, ज्याची किंमत अंदाजे १६,००० रुपये आहे, जप्त केले आहे. याप्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध मुंबईनाका पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण अधिनियमाच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहवा डी. टी. गाढवे करत आहेत. फरार आरोपी शोएबचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत आणि सहायक आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे आणि त्यांच्या पथकाने यशस्वी केली. शहरात अशाप्रकारे अवैध कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच, नागरिकांना आपल्या परिसरात काही संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!