व्यवसायाच्या नावाखाली तरुणीसह तिच्या आईलाही घातला गंडा; गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू.
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. १५: प्रेमसंबंधाचे नाटक रचून, व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवत एका तरुणाने आपल्या प्रेयसीला आणि तिच्या आईला तब्बल २१ लाख ६२ हजार रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या कॉलेजरोड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात नेहुल भाऊसाहेब सोनवणे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेनंतर तो फरार झाला आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित (वय २३, रा. कामटवाडे, नाशिक) या शिक्षण घेत असून ट्रेडिंगचे काम करतात. त्यांची ओळख आरोपी नेहुल भाऊसाहेब सोनवणे (रा. कामटवाडा, नाशिक) याच्यासोबत झाली. ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमसंबंधात झाले. नेहुलने एडिट तरुणीला पूर्ण विश्वास संपादन केला.
सन २०२१ पासून त्याने श्रृतीला आपल्या जाळ्यात ओढायला सुरुवात केली. “मला व्यवसायात पैशांची गरज आहे, मोठा नफा मिळेल आणि तुझे पैसे व्याजासह परत करेन,” असे भावनिक आवाहन करून त्याने पीडित तरुणी कडून वेळोवेळी पैसे उकळण्यास सुरुवात केली. स्वतःच्या कमाईतून आणि भविष्यासाठी साठवलेले तब्बल १६ लाख ६५ हजार रुपये त्याच्यावर विश्वास ठेवून दिले.
आरोपी नेहुल एवढ्यावरच थांबला नाही. त्याने पीडित तरुणीच्या आई यांनाही आपल्या बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडूनही व्यवसायासाठी ४ लाख ९७ हजार रुपये घेतले. पीडित तरुणी आणि तिच्या आईने अनेक महिने पैसे परत मिळण्याची वाट पाहिली. मात्र, जेव्हा त्यांनी पैशांसाठी तगादा लावला, तेव्हा नेहुलने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली आणि नंतर संपर्क तोडून तो फरार झाला.
अखेरीस आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने धाडस दाखवून गंगापूर पोलीस ठाणे गाठले. रात्री उशिरा तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ आरोपी नेहुल सोनवणे विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) आणि ३५६(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निखील पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपीचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नसला तरी, त्याने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा गुन्हा केल्याचा पोलिसांना संशय आहे. या घटनेमुळे नाशिकच्या सुशिक्षित वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, प्रेमसंबंधांच्या नावाखाली होणाऱ्या आर्थिक फसवणुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.







